|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ओंकार दीक्षितचे ‘गाव गाता गजाली’त संवाद

ओंकार दीक्षितचे ‘गाव गाता गजाली’त संवाद 

कणकवली : मुंबई, पुण्यासारख्या मोठय़ा शहरातील कलाकारांनाच चित्रपट, टीव्ही मालिका, नाटके अशा चमचमत्या दुनियेत संधी मिळते, असा आजवरचा समज आहे. पण, गुणवत्ता आणि चिकाटी असेल, तर पडेल (ता. देवगड) सारख्या छोटय़ाशा गावातीलही एखादा कलावंत या माध्यमांपर्यंत पोहोचू शकतो. पडेल येथील ऍड. ओंकार दीक्षित या युवकाला झी मराठी वाहिनीवर 2 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या ‘गाव गाता गजाली’ या मालवणी मालिकेचे क्रिप्ट लेखन करण्याची संधी मिळाली आहे. या त्याच्या यशाबद्दल सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मालवणी गजालींचे वर्णन करणाऱया या मालिकेचे संवाद लेखन प्रल्हाद कुडतरकर यांच्यासह ऍड. ओंकार दीक्षित करीत आहे. ओंकारने यापूर्वी ई टीव्ही मराठी वाहिनीवरील ‘कॉमेडी एक्सप्रेस’, झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’, ‘पुणेरी मिसळ’ आदी मालिकांसाठी ‘क्रिप्ट’ लिहिल्या आहेत. आता आपल्या मातीतील गजाली लिहिण्याची संधी त्याला मिळाली आहे.

महाविद्यालयीन जीवनापासूनच लेखन

ओंकारचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पडेल, येथे तर महाविद्यालयीन शिक्षण देवगड महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात असताना विज्ञान शाखेच्या या विद्यार्थ्याने प्रथम मुंबई विद्यापिठाच्या उडान महोत्सवासाठी एकांकिका लिहिली. तिला पारितोषिकही मिळाले. पुढे वकिलीचे शिक्षण घेत असताना ई टीव्ही मराठी वाहिनीने केलेल्या आवाहनानुसार त्याने ‘कॉमेडी एक्सप्रेस’साठी काही क्रिप्ट पाठविल्या. या ‘क्रिप्ट’ प्रसिद्धही झाल्या. त्याचाच परिणाम म्हणजे झी मराठीवरील ‘फु बाई फु’, ‘पुणेरी मिसळ’ या मालिकांसाठीही लिखाण करण्याची त्याला संधी मिळाली.

‘झी’ची अनोखी संकल्पना

याविषयी ओंकार सांगतो, ‘मालवणी माणूस आणि गजाली’ हे तसे समीकरणच. मी स्वतः पडेल सारख्या छोटय़ा गावात जन्माला आलो व तेथेच लहानाचा मोठा झालो. त्यामुळे झी मराठीची ही मालवणी मालिकेची संकल्पना मला भावली. या मालिकेत कोकणी माणसाचे विविध पैलू रसिकांना पाहायला मिळतील. आतापर्यंत सातत्याने विनोदी लिखाण केले. मात्र, मालवणीत विनोदी लिखाण करण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली. अर्थातच ‘होमपीच’वर फटकेबाजी करण्याची मज्जा लाजवाब असल्याचेही ओंकार म्हणाला.

मालिकेत अभिनयही केला

ओंकारने या मालिकेच्या काही भागांमध्ये अभिनयही केला आहे. त्यातील दोन भागांमध्ये तो ‘भोंदूबाबा’ची प्रमुख भूमिका साकारत आहे. यापुढेही लिखाणात सातत्य ठेवणार असून चित्रपटाच्या ‘क्रिप्ट’ लिहिण्याचाही त्याचा मानस आहे. पडेलसारख्या छोटय़ा गावात राहूनही ओंकारने मिळविलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे.