|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » रस्ता वाहून गेल्याने चिगुळेचा संपर्क तुटला

रस्ता वाहून गेल्याने चिगुळेचा संपर्क तुटला 

प्रतिनिधी/ डिचोली

कणकुंबी येथील कर्नाटक निरावरी निगमतर्फे सुरु असलेल्या कळसा कालवाच्या बांधकामामुळे गेली काही वर्षे मरणयातना भोगणाऱया कणकुंबी व परिसरातील गावातील लोकांना या पावसाळ्यात अत्यंत भयानक स्थितीला सामोरे जावे लागण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात धोक्याच्या छायेखाली असणारा चिगुळे गावाला जोडणारा रस्ता वाहून गेल्याने या गावचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे लोकांचे हाल झालेले असून सर्वत्र चिखल व दलदल पसरलेली आहे. तसेच कणकुंबी व परिसरातील शेतीही संकटात आलेली आहे.

कणकुंबी मलप्रभा नदीच्या उगमस्थळी माऊली मंदिरासमोर कर्नाटक निरावरी निगमने सुरू केलेल्या कामाचा फटका यापूर्वीही या भागातील तसेच आजुबाजूच्या गावातील लोकांना बसतच आहे. मोठय़ा प्रमाणात धूळ प्रदूषणानंतर आता पावसाळ्यात येथील ग्रामस्थांवर नवे संकट उभे राहिले आहे. जेमतेम पावसानंतर या भागात चिखल साचतो. दमदार झालेल्या पावसामुळे चिगुळे या गावाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे वाहून गेलेला आहे. त्यामुळे येथील लोकांना तीव्र संताप व्यक्त केलेला आहे.

चिगुळे गावचा संपर्कच तुटलेला असून या गावात वाहने नेणे दुरापास्त झालेले आहे. कालवा खचत चालल्याने नवे संकट उभे राहिले आहे. याठिकाणी मलप्रभा नदीचा उगम झाल्याने पुरातन मार्गाने वाट काढल्याची चर्चा आहे. माऊली मंदिर परिसरातील जमीन खचली आहे. या मंदिराचा सभामंडप यापूर्वीच उध्वस्त झाला होता व मंदिरालाही धोका निर्माण झाला आहे.

कणकुंबीतील शेतीची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झालेली आहे. कालव्यांची मोठय़ा प्रमाणात माती शेतामध्ये घुसल्याने शेतकऱयांसमोर संकट उभे ठाकले आहे. या मोसमात तरी सदर परिस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता नाही. शेतीतील माती काढणे व शेतजमीन पूर्वपदावर आणणे मुश्कीलीचे बनलेले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील बनलेले आहेत.

भाविकांच्या तसेच कणकुंबी व परिसरातील ग्रामस्थांच्या भावनांशी कर्नाटक सरकारने खेळ मांडला आहे. कणकुंबीतील परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत चालली आहे. कालव्याचे काम बंद करण्याचा आदेश धुडकावून ते चालूच ठेवल्याने हा भरलेला कालवा दिवसेंदिवस खचतच चालला आहे. त्यामुळे येणाऱया काळात भयानक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. अशी माहिती किरण गावडे व रामदास शेटकर यांनी दिली.

कर्नाटकाच्या या भुमिकेबद्दल कणकुंबी व परिसरातील गावच्या ग्रामस्थांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. येथे केवळ आमचा छळ चालला असून पूर्ण गावच नेस्तनाबूत करण्याचे काम सुरू आहे. अशा प्रतिक्रिया शेतकरी व ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

 

Related posts: