|Thursday, February 27, 2020
You are here: Home » leadingnews » सदाभाऊंचा स्वाभिमानीला पूर्णविराम; नोटीसीच्या उत्तरात खा. राजू शेट्टींवर दांडपट्टा

सदाभाऊंचा स्वाभिमानीला पूर्णविराम; नोटीसीच्या उत्तरात खा. राजू शेट्टींवर दांडपट्टा 

ऑनलाईन टीम / पुणे :

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दशरथ सावंत समितीने दिलेल्या 26 प्रश्नांच्या उत्तरात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पक्षाचे संस्थापक व खासदार राजू शेट्टी यांच्यावरच दांडपट्टा फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षावर शेट्टींच्या इतकाच आपलाही अधिकार आहे. घराणेशाही, जातीयवाद, पक्षाने भाजप सरकारमधून बाहेर पडावे का? अशा सर्व अडचणींच्या प्रश्नांवर टोले लगावत नेतृत्वाच्या आत्म्याला आवाहन केले आहे. आपणास कोणताही पश्चाताप होत नसल्याने आत्मक्लेश करण्याची गरज वाटत नाही. आपण आता संघटनेलाच पूर्णविराम देत असून, यापुढे कोणत्याही समितीला सामोरे जाणार नाही, तर शेतकऱयांमध्ये जाऊ व ऑगस्टमध्ये पुढील निर्णयाची घोषणा करू, अशी भूमिका कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी येथे जाहीर केली

 शरद जोशींबरोबर कार्य केलेले ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांच्या नेतृत्वाखालील माजी प्रदेशाध्यक्ष पोकळे, रवीकांत तुपकर आदींचा समावेश असलेल्या चौकशी समितीला सदाभाऊ खोत सामोरे गेले. नेतृत्वाने माझ्यावर वार केलेल्यांना प्रोत्साहन दिले. माझाही या पक्षावर राजू शेट्टी यांच्या इतकाच अधिकार आहे. ज्येष्ठांचा अधिकार आहे. मात्र कधी संघटनेचा बिल्लाही न लावलेली मंडळींना मी खुलासा करतो आहे. पण, यातून नेतृत्वाला (खा. शेट्टी यांना) आनंद मिळत असेल तर त्याचा मलाही आनंद होईल. या पक्षापासून मला वेगळं करण्याचा प्रयत्न होत आहे पण ज्या मातीत मी घडलो ती माती माझ्यासोबत आहे असे सदाभाऊ बोलल्याचे समजते.

समितीला सादर केलेल्या अनेक प्रश्नांमध्ये सदाभाऊ खोत यांना अडचणीत आणणारे अनेक प्रश्न हेते. त्यातील राजू शेट्टी यांची भूमिका म्हणजे नौटंकी वाटते का? आणि भ्रमनिरास झाल्याने स्वाभिमानी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत आपले मत काय? असा प्रश्न होता. यावर राजू शेट्टींना काँग्रेस पापी वाटत होती तर त्यांनी कोल्हापुरात स्वतः काँग्रेसबरोबर युती करून जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापतीपद का भूषविले होते.  अशी जुनी आठवण करून देत भाजपच्या बाबतीत  भ्रमनिरास झाला असेल तर स्वाभिमानी आजही सांगली, कोल्हापूर जिल्हय़ात जिल्हापरिषदेला भाजपच्या सत्तेत सामील आहे. राष्ट्रपती पदासाठी शेट्टी यांनी भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला आहे. राजु शेट्टींच्यासाठी अशी स्वतंत्र नियमावली आहे काय? भ्रमनिरास झाल्याने ते जेव्हा भाजपच्या सत्तेतून बाहेर पडल्यावर आपण त्यावर भाष्य करू असे सदाभाऊंनी म्हटले आहे.चळवळीविरोधी कृत्य केल्याचा तुम्हाला पश्चाताप होतो का? त्याचे पापक्षालन कसे कराल? या प्रश्नावर मला कोणताही आत्मक्लेश झालेला नाही. मी सरकारला शेतकऱयांच्या दिशेने घेऊन जाण्याचे काम करतो आहे. ज्यादिवशी मला हे काम जमणार नाही तेव्हा मी नक्की आत्मक्लेश करेन.

मुलाला राजकारणात उतरवण्याची घाई करत घराणेशाही करून शेतकरी चळवळीच्या संस्कृतीला बाधा आणली या आरोपावर दिलेल्या उत्तरामध्ये आपण मुलाला राजकारणात आणण्यासाठी प्रोत्साहन दिले नाही हे खा. शेट्टींच्या आंतरात्म्याला माहीत आहे. शिवाय प्रकाश परीट, उल्हास पाटील, जालिंदर पाटील या संघटनेच्या शिलेदारांनंतर त्यांच्या पत्नीला संघटनेने जिल्हापरिषदेला उमेदवारी दिली आहे. अनेक घराण्यांच्या वारसदारांना आमदारकीला उमेदवारी दिली. असे असूनही संघटनेने घराणेशाहीबाबत काही नियमावली तयार केली असती तर आपण त्याचे पालन केले असते असे उत्तर खोत यांनी दिले आहे.

दोन नेत्यातील वाद किती टोकाला पोहोचला आहे याचे प्रत्यंतर प्रश्न आणि उत्तरातून येते. आमदारांच्या पगारवाढीला विरोध करून ती नाकारली का नाही? या प्रश्नावर आधी विरोध करून नंतर लाभ घेणे आपणास पटत नाही. राजू शेट्टी यांनी माध्यमांसमोर पगारवाढीला विरोध केला. पण, खासदारकीचे वाढीव मानधन केंद्र सरकारला परत केले असेल तर कळवा त्यांच्या प्रमाणेच मीही माझे मानधन परत करतो. महिला प्रदेशाध्यक्ष ढगे यांना सदाभाऊंनी ते आणि आपण वेगळे आहोत असा जातीयवादी उल्लेख केल्याचा आरोप केला होता. त्याच्या उत्तरात सावकार मादनाईक यांना उमेदवारी देऊन राजू शेट्टी मतदार संघातील अनेक गावात फिरकले नाहीत. उल्हास पाटील यांच्याविरोधात शिरोळसह सर्व गावात तोफेच्या तोंडी मी होतो. खासदार नव्हते. योगदान विसरण्याची नेतृत्वाला सवय आहे. असा टोला लगावला आहे. याबाबतीत एक ऑडीओ सदाभाऊ खोत यांनी समितीसमोर वाजवला असल्याचे समजते. 

शेट्टी आणि खोत यांच्यापैकी कोणीच माघार घ्यायला तयार नाहीत हे स्पष्ट करणारे अनेक मुद्दे या प्रश्नोत्तरात आहेत. मात्र राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील सुकाणु समितीला सुकलेली समिती अशी टीका खोत यांनी का केली असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याच्या उत्तरात खोत यांनी पक्षावर आपलाही हक्क सांगितला आहे. ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांना प्रत्युत्तर देण्याचं व्यक्तीस्वातंत्र्य मला आहे. समोरून वार होत असताना हात बांधून झेलणं सदाभाऊच्या रक्तात नाही. माझ्यावर टीका करताना नेतृत्वाने माझी औलाद काढली. मी माझ्या आईवडिलांनी दिलेल्या संस्काराप्रमाणे सुकाणू नव्हे सुकलेली समिती अशी टीका केली. सुकाणू समितीत स्वाभिमानी सामील होण्यासाठी कार्यकारिणची बैठक घेतली होती का? हे विचारण्याचा मलाही तितकाच अधिकार आहे. असे उत्तर दिले असून आपल्यासाठी आणि खा. राजू शेट्टी यांच्यासाठी पक्षात वेगवेगळे निकष कसे काय असू शकतात असा प्रश्नही सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.

Related posts: