|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विनय तेंडुलकर बनले राज्यसभा खासदार

विनय तेंडुलकर बनले राज्यसभा खासदार 

प्रतिनिधी / पणजी

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी राज्यसभेच्या गोव्यातील एकमेव जागेवर बाजी मारली. त्यांच्या पारडय़ात 22 मते पडली तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व विद्यमान राज्यसभा अध्यक्ष शांताराम नाईक यांना 16 मते पडली. गोव्याच्या इतिहासात प्रथमच राज्यसभेवर भाजपचा नेता निवडला गेला आणि काँग्रेसचा पराभव झाला. तेंडुलकर यांनी आपल्या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिले.

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची सोळाही मते एकसंघ राहिली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची 5 मते फुटल्याने पक्षांतर्गत बरीच खळबळ माजली होती. तथापि, राज्यसभा निवडणुकीत दोन्ही उमेदवारांचा एकेक प्रतिनिधी मतदान कक्षात उभा करण्यास परवानगी देण्यात आली. मतदारांनी मतदान करण्यापूर्वी आपली मतपत्रिका संबंधित पदाधिकाऱयाला दाखविता येते. हे मतदान तसे गुप्त नव्हते. त्यामुळे काँग्रेसचे एकही मत फुटले नाही. अन्यथा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत काही मते फुटण्याची शक्यता होती. गोव्याच्या राज्यसभा निवडणुकीच्या 30 वर्षांच्या इतिहासात प्रथमच काँग्रेसचा पराभव झाला. तो देखील राज्यसभा सदस्याचा पराभव झालेला आहे.

चर्चिलचे मत भाजपला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नवी दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपली मते भाजपचे रामनाथ कोविंद यांना देण्याची घोषणा केल्यानंतर राज्यसभा निवडणुकीतही चर्चिलनी भाजपचे विनय तेंडुलकर यांना मतदान केल्याने भाजपच्या पारडय़ात 22 मते पडली. 38 सदस्यीय गोवा विधानसभेत सत्ताधारी आघाडी पक्षात भाजपची 12, मगोची 3, गोवा फॉरवर्डची 3 व अपक्ष 3 मिळून 21 सदस्य आहेत. विरोधी काँग्रेसकडे 16 मते आहेत.

विधानसभा प्रकल्पात स. 10 वा. मतदानास प्रारंभ झाला. भाजपच्या आमदारांनी प्रथम मतदान केले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुरवातीलाच मतदान केले. त्यानंतर 11 वा. काँग्रेसच्या बहुतेक आमदारांनी मतदान केले. दु. 12 पर्यंत जवळपास सर्वच म्हणजे 38 जणांनी मतदान केले. त्यानंतर सायं. 5 वा. मतमोजणीला प्रारंभ झाला व 5.30 वा निकाल जाहीर करण्यात आला. विनय तेंडुलकर यांना 22 तर शांताराम नाईक यांना 16 मते पडली. 6 मतांच्या फरकाने तेंडुलकर विजयी झाले. 1987 पासून राज्यसभा निवडणुकीत सतत काँग्रेस उमेदवारच विजयी झाला होता.

सारे श्रेय पर्रीकरांना : तेंडुलकर

तेंडुलकर यांनी विजयाचे श्रेय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिले. सारे आमदार भाजपबरोबर आणि विशेषतः पर्रीकर यांच्याबरोबर राहिले. आघाडीतील सर्व घटकपक्षांचे आमदार व नेते या सर्वांचे आभार मानतो, असे तेंडुलकर म्हणाले. गोव्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व योजना आणल्या जातील, तसेच गोव्याचे अनेक विषय आपण राज्यसभेत मांडणार, असे ते म्हणाले. या निवडणुकीने एक वर्तुळ पूर्ण झाले. पंचायती, पालिका, जिल्हा पंचायती, विधानसभा, खासदार, राष्ट्रपती  हे सर्व भाजपचेच आहेत. आता राज्यसभेची गोव्याची एक जागाही भाजपलाच मिळाली असून उपराष्ट्रपतीही भाजपचे होतील, असे तेंडुलकर म्हणाले.

तेंडुलकर यांच्या विजयानंतर भाजप आमदार तेंडुलकर यांना घेऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यालयात पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले.

भाजप कार्यालयासमोर जल्लोष!

दरम्यान, विनय तेंडुलकर हे राज्यसभेवर विजयी झाल्याने भाजप पदाधिकाऱयांनी प्रदेश भाजप मुख्यालयासमोर येऊन पणजीत जल्लोष केला. माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तेंडुलकर यांनी साऱया गोमंतकीय जनतेचे आभार मानले.

तुळशीदास मळकर्णेकरकृत अभिनंदन

दरम्यान, गोवा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष व स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास मळकर्णेकर यांनी तेंडुलकर हे राज्यसभेवर विजयी झाल्याबद्दल अभिनंदन केले. पक्षासाठी तेंडुलकर यांनी जे काम केले व पक्षाशी ते प्रामाणिक राहिले त्याबद्दल त्यांना हे फळ मिळाले. त्यामुळे तमाम ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आपण त्यांचे अभिनंदन करतो असे ते म्हणाले.

 

Related posts: