|Saturday, February 22, 2020
You are here: Home » leadingnews » मोदींचा जीएसटी म्हणजे टॅक्स टेररिजमच : चिदंबरम

मोदींचा जीएसटी म्हणजे टॅक्स टेररिजमच : चिदंबरम 

पुणे / प्रतिनिधी :

मोदी सरकारकडून जीएसटीच्या नावाखाली लूट सुरु असून, हा एकप्रकारचा टॅक्स टेररिजमच आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सरकारवर आज तोफ डागली.

पुणे श्रमिक संघाच्या वतीने ‘अंतर्गत सुरक्षा आणि सद्यःस्थितीतील अर्थव्यवस्था’ या विषयावर वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे उपस्थित होते.

चिदंबरम म्हणाले, काँग्रेसच जीएसटीचा जनक आहे. आम्हीच सुरुवातीला जीएसटी आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्या वेळी भाजपाने खोडा घातला. मात्र, सत्तेवर आल्यानंतर यासाठी मोदी सरकारने पुढाकार घेतला. अर्थात आम्ही त्याला पाठिंबा दिला. मात्र, सध्याचा जीएसटी हा जीएसटी नाहीच. तर तो मल्टि रेट टॅक्स आहे. याअंतर्गत महिन्याला तीन वेळा रिटर्न्स, तर वर्षाला 37 वेळा रिटर्न्स व्यापाऱयांना भरावे लागतील. वास्तविक, जीएसटी लागू करण्यापूर्वी 2 महिनेआधी प्रायोगिक तत्त्वावर ही करप्रणाली राबवायला हवी होती. त्यानंतरच त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे होते. मात्र, आता जीएसटीच्या नावाखाली लूट सुरू असून, तो एकप्रकारचा टॅक्स दहशतवादच आहे. बिस्किटसाठी वेगळा, तर चॉकलेटसाठी वेगळा कर कसा, असा मिश्कील सवालही त्यांनी केला.

जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, काश्मीरमधील स्थिती सध्या अत्यंत चिंताजनक आहे. सरकारला ती नीटपणे हाताळता आलेली नाही. दहशतवादाने तेथे थैमान घातले आहे. यात भारतीय लष्कराचे अनेक जवान, नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. 2015 सालापेक्षा 2016 व त्यापेक्षा चालू वर्षी सर्वात जास्त हानी झाली आहे. दररोज एक-दोन जवान शहीद होत आहेत. इतकी विदारक परिस्थिती आहे. नियंत्रण रेषेवर शांतता नाही, सुरक्षितता नाही. दुसरीकडे नक्षलवादाची समस्याही बिकट झाली आहे. ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर या राज्यांना कमजोर बनवण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.

शेतकऱयांच्या तोंडालाही या सरकारने पाने पुसली आहेत. शेतकऱयांना 50 हजार वा दीड लाखाची कर्जमाफी ही तुटपुंजी आहे. निराशेपोटीच शेतकऱयांच्या आत्महत्या होत आहेत, याकडे लक्ष वेधतानाच गोरक्षकांच्या मुद्दय़ावर नुसती चिंता व्यक्त करून भागणार नाही. तर त्याबद्दल पंतप्रधानांनी ठोस कारवाई केले पाहिजे. गप्प बसता कामा नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

2019 मध्ये काँग्रेस जोमाने निवडणुकीत उतरणार आहे. निवडणुकीला अजून दोन वर्षे बाकी आहेत. त्यामुळे आताच अंदाज बांधणे घाईचे ठरेल. एका नव्हे; तर अनेक मुद्दय़ांभोवती आगामी निवडणूक असेल. या निवडणुकीला आम्ही निश्चितपणे ताकदीने सामोरे जाऊ, असा निर्धारही चिदंबरम यांनी व्यक्त केला.

Related posts: