|Thursday, September 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » धार्मिक जीवन म्हणजे काय?

धार्मिक जीवन म्हणजे काय? 

धर्म हा शब्द अनेक प्रकारे वापरण्यात येतो. एक प्रकार कर्तव्य, जबाबदारी या अर्थाने आहे. उदाहरणार्थ : राजधर्म म्हणजे राजाचे कर्तव्य, त्याची जबाबदारी. त्याचप्रमाणे क्षात्रधर्म, गृहस्थधर्म, संन्यासधर्म, सेवकधर्म, पतिधर्म, पत्नीधर्म, इत्यादी. धर्माचा असा अर्थ प्रत्येक मानवी संस्कृतीने आपापल्या गरजेनुसार ठरवला व जोपर्यंत त्या संस्कृतीचे घटक आपापला धर्म पाळत होते तोपर्यंत ती संस्कृती टिकून राहिली. परंतु जेव्हा कोणीही धर्म पाळेनासा झाला तेव्हा अधर्म माजून त्या त्या संस्कृतीचा ऱहास झाला.

दुसऱया प्रकारात धर्म हा शब्द मूलभूत स्वभाव, गुणवत्ता या अर्थाने वापरला जातो. उदाहरणार्थ शेपटीवर पाय पडल्यास चावणे हा सापाचा स्वभावधर्म आहे. त्यामुळे असे म्हणतात, की सापाला कितीही दूध पाजले तरी शेपटीवर पाय दिल्यास तो आपला सर्पधर्म विसरत नाही. आगीला स्पर्श केल्यास जाळून टाकणे अथवा भाजणे हा आगीचा गुणधर्म आहे. साखर गोड असणे हा साखरेचा गुणधर्म आहे. कोणत्याही पदार्थाला त्याच्या गुणधर्मापासून वेगळे करता येत नाही.

कोणतीही सामाजिक व्यवस्था टिकून राहण्यासाठी त्या समाजात राहणाऱयांच्या आवश्यकता पूर्ण व्हाव्या लागतात. समाजाची नीतिमूल्ये पाळली जावी लागतात. परंतु केवळ प्रशासनाच्या बळावर हे शक्मय नाही. त्यासाठी विविध धर्मांनी आपापल्या परीने मदत केली आहे. सुरक्षितता ही प्रत्येक व्यक्तीची मूलभूत गरज आहे. माणसाला शारीरिक सुरक्षिततेबरोबर मानसिक सुरक्षिततेचीदेखील गरज असते. जगातील विविध धर्मांनी देव या संकल्पनेतून ही मानसिक सुरक्षितता देण्याचा प्रयत्न केला. तसेच सामाजिक व्यवस्थेसाठी आवश्यक असलेली नीतिमूल्ये पाळली जावी म्हणून बहुतेक धर्मांनी स्वर्ग-नरकाच्या कल्पना मांडल्या. जो कोणी धर्माने सांगितलेली नीतिमूल्ये पाळेल तो मृत्यूनंतर स्वर्गात जाईल जेथे त्याला सर्व प्रकारची सुखे फुकट मिळतील. जो ही नीतिमूल्ये पाळणार नाही तो नरकात जाईल जेथे त्याचे सर्वप्रकारे हालहाल केले जातील. असे प्रतिपादन करून धर्मांनी मानवाला नीतिमूल्ये पाळण्यास भाग पाडले. एवढे करूनही ज्या व्यक्तींनी याला विरोध केला, त्यांना धर्मशत्रू व समाजशत्रू घोषित करून त्यांचा छळ करण्यात आला.

धर्मांचे अस्तित्व हे नेहमीच विश्वास, भावना व श्रद्धा यावर अवलंबून राहिल्याने त्यातून अनेक वेडगळ समजुती, भ्रामक संकल्पना, अंधश्रद्धा व रूढी निर्माण झाल्या. परंतु विज्ञानाने या सर्व गोष्टींसंबंधी प्रश्न करून धार्मिकतेच्या मुळावरच घाव घातला. अचूक निरीक्षण, तंतोतंत मोजमाप व प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे सातत्याने केलेली पडताळणी आणि त्यातून प्रत्यक्षात अनुभवास येणारे निष्कर्ष यामुळे सर्व प्रचलित धार्मिक कल्पना निरर्थक ठरू लागल्या. त्यामुळे विज्ञानयुगात पारंपरिक धार्मिकतेला फारसे स्थान उरले नाही.

आजच्या या विज्ञानयुगात मानव मानसिकदृष्टय़ा अजूनही असुरक्षित आहे. मानवाच्या सर्व भौतिक गरजा पूर्ण करण्याचे सामर्थ्य असूनही मानवतेचा एक मोठा हिस्सा भौतिक सुखांची असंख्य साधने उपलब्ध झाल्याने मानव करमणूक व भोगवादाच्या दिशेने निघाला आहे. कोणतीही नीतिमूल्ये पाळण्याची गरज नाही, प्रत्येकजण अगदी हवे तसे वागू शकतो अशा प्रकारची धारणा मानवी मनात मूळ धरू लागली आहे. विज्ञान मानवी स्वभावधर्म बदलण्यात असमर्थ ठरले आहे. उलट मानव आपल्या स्वभावधर्मानुसार विज्ञानाचा वापर करत आहे, ज्याच्या परिणामस्वरूप त्याने अतिसंहारक शस्त्रास्त्रे बनवली आहेत. यातून साहजिकच प्रश्न उद्भवतात, की एक विज्ञाननि÷ मन धार्मिक असू शकते का? मानवाने विचाराद्वारे निर्माण केलेल्या धार्मिकतेपेक्षा निसर्गनियमांच्या अंतर्गतच धार्मिकता अनुस्यूत असू शकते का? नीतिमत्ता व मानवी मूल्ये यांना काही वस्तुनि÷ आधार आहे का, की त्या केवळ भोळय़ा-भाबडय़ा मानवी मनाच्या संकल्पना आहेत?

धर्म म्हणजे जीवनाविषयीचे सत्य जाणण्यासाठी आपल्यातील सर्व ऊर्जा एकवटणे. जीवनाविषयीचे सत्य हे दूर कोठेतरी जंगलात अथवा गुहेत नव्हे, तर आपल्या दैनंदिन जीवनातच शोधायचे असते. कोणत्याही गोष्टीचा शोध घेण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. निसर्ग हा ऊर्जेच्या बाबतीत अत्यंत कंजूष आहे. नैसर्गिक
प्रक्रिया इतक्मया काटेकोरपणे घडतात, की ऊर्जेचा प्रत्येक कण न कण सार्थकी लावला जातो. प्रत्येक प्रक्रिया कमीत कमी ऊर्जा खर्च होईल अशा पद्धतीने घडते. सत्यशोधनासाठी आवश्यक ऊर्जा माणसाला आपल्या जीवनातूनच मिळवावी लागते.

मनुष्य जेव्हा ऊर्जेसाठी आपल्या दैनंदिन जीवनाकडे पाहू लागतो, तेव्हा त्याच्या लक्षात येते, की त्याची पुष्कळशी ऊर्जा ही क्षुल्लक गोष्टींवर खर्च होत आहे. अनावश्यक गोष्टींमधून वाया जाते आहे, अनेक मानसशास्त्रीय अनुभवांमध्ये गुंतलेली आहे, हे लक्षात येताच मनुष्य सावध होतो व हा ऊर्जेचा अपव्यय थांबून मानसशास्त्रीय अनुभवांमध्ये गुंतलेली ऊर्जा कशी मुक्त करता येईल यासंबंधी तो विचारणा करू लागतो.

आपल्या दैनंदिन जीवनात आपण असंख्य मार्गांनी ऊर्जेचा अपव्यय करत असतो. शारीरिक पातळीवरः चुकीचा आहार, अतिसेवन, धूम्रपान, तंबाखूसेवन, मद्यपान, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक, आळस, शिळोप्याच्या गप्पा (गॉसिप), वायफळ बडबड, भांडणे, कलह, इत्यादी मानसशास्त्रीय पातळीवरः चिडचिडेपणा, संघर्ष, मानसिक द्वंद्व, चिंताग्रस्तता, भय, क्रोध, मानसिक ताण-तणाव, विविध वासना व त्यांचा पाठपुरावा, मानसिक तुलना, स्पर्धा, हेवा-दावा, ईर्ष्या, मत्सर, अनेक स्वकेंद्रित क्रियालाप, इत्यादी. तसेच कोणतीही घटना जेव्हा आपण अर्धवट अनुभवतो तेव्हा खूप सगळी ऊर्जा त्या अनुभवाच्या स्मृतीत गुंतली जाते. या गोष्टी जसजशा लक्षात येऊ लागतात तसतसे मनुष्य आपल्या जीवनातील प्रत्येक घटना अवधानपूर्वक जगून संपवण्याचा प्रयत्न करू लागतो. ऊर्जेचा अपव्यय करणाऱया ज्या गोष्टी सहजपणे संपवण्यासारख्या आहेत, त्या तो संपवून टाकतो. ज्या गोष्टी सहजपणे संपणाऱया नाहीत त्यांच्या मुळाशी जाऊन तो त्यांचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याच्या या विचारणेच्या परिणामस्वरूप जेव्हा त्याच्या चेतनेतील मानसशास्त्रीय घटक गळून पडू लागतात, तेव्हा त्यात गुंतलेली ऊर्जा मुक्त होऊन त्याच्या शोधाला उपलब्ध होऊ लागते. याचा अर्थ तो खरे धार्मिक जीवन जगू लागलेला असतो. या जीवनाची गुणवत्ता त्याला आतून जाणवू लागते. एक म्हणजे ऊर्जेमुळे आलेला निरंतर उत्साह व दुसरे म्हणजे खूप सारे मानसशास्त्रीय ओझे उतरल्यामुळे येणारी उन्मुक्तता. जेव्हा त्याच्यातील ऊर्जेचा अपव्यय पूर्णपणे थांबतो, तेव्हा त्याच्या जीवनाला तो परीसस्पर्श होतो, ज्यामुळे त्याचे सर्व जीवनच पालटून जाते, त्याची संपूर्ण मानसशास्त्रीय घडणच बदलून जाते. कारण त्याच्या जीवनात प्रेमाचा उदय झालेला असतो- ते प्रेम, जे स्थलकालनिरपेक्ष असते व ज्याचे प्रज्ञा आणि मुक्तता हे गुणधर्म असतात.