|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पंत गेले, राव चढले

पंत गेले, राव चढले 

एके काळी पुणे गावात टांगेवाल्यांची एकाधिकारशाही होती. टांगेवाले तिचा भरपूर फायदा घेत. गावातल्या गावात फिरण्यासाठी दुसरे वाहन नव्हते. बाहेरगावाहून वेळी-अवेळी आलेल्या प्रवाशाला तर टांगेवाले अगदी लीलया फसवीत. पाचशे मीटर अंतरावर गंतव्य स्थान असले तरी गोल फिरवून दोनेक हजार मीटरची फेरी करीत आणि प्रवाशांकडून पैसे उकळीत. त्याबद्दल लहानपणी वाचलेला एक किस्सा आठवतो. एका प्रवाशाला असेच जवळच्या अंतरावर जायचे होते. पण टांगेवाल्याने त्याला भुलवून फिरवायला सुरुवात केली. त्या गडबडीत एकदा टांगा शनिवारवाडय़ाच्या एका बाजूने गेला. पाच मिनिटांनी पुन्हा दुसऱया बाजूने गेला – तेव्हा प्रवाशाने टांगेवाल्याला जाब विचारला. टांगेवाल्याने उत्तर दिले की पुण्यात दोन शनिवारवाडे आहेत. एक खरा आहे आणि इंग्रजांनी हल्ला केला तेव्हा त्यांना चकवण्यासाठी पुणेकरांनी दुसरा नकली वाडा बांधला होता. या टांगेवाल्यांची ही मोनोपली मोडून काढण्यासाठी इंग्रज सरकारने ज्युबिली मोटर्स सर्व्हिस नावाच्या बस कंपनीला परवानगी दिली होती. तेव्हा तिला विरोध करण्यासाठी टांगेवाल्यांनी कलेक्टर कचेरीवर मोर्चा नेला होता.

पण ती बस कंपनी आलीच. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यावर नगरपालिकेच्या बसेस आल्या. सत्तरच्या दशकात भरपूर रिक्षा आल्या. त्यांनी टांगेवाल्यांची दादागिरी मोडून काढली. टांगेवाले नामशेष झाले. संपलेच. आता गेली पाचेक दशके अनेक शहरात रिक्षावाले-टॅक्सीवाले सत्तेत आहेत. ते कसे वागतात हे सर्वांना ठाऊक आहे.

पण कालचक्र फिरत राहते. आता ओला-उबर वगैरे कॅबसेवा बाजारात येत आहेत. रिक्षाचालक त्यांच्या नावाने बोटे मोडत आहेत. अशीच बोटे त्या वेळी टांगेवाल्यांनी मोडली असतील.

हे सगळे आठवले ते जियो कंपनीच्या सतत येणाऱया सवलतींमुळे. आमच्या लहानपणी घरात फोन असणे हे फारच मोठय़ा प्रति÷sचे लक्षण होते. फोन महाग होते आणि पैसे असले तरी सहजी मिळत नसत. हॉटेल किंवा अन्य जागेवरून फोन करायचा झाला तर त्या वेळचे तीन रुपये मोजावे लागत. बाहेरगावी फोन करण्यासाठी जीपीओ कचेरीत जाऊन रांगेत उभे रहावे लागत असे. राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत या मोनोपोलीला तडा गेला. आधी देशभर पीसीओ, एसटीडी बूथ आले. मग मोबाईल आले. आणि एकेका कंपनीची दादागिरी मोडून पडू लागली. सध्या देशात जियोचे दिवस येऊ घातलेत.

कालाय तस्मै नमः