|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » तीन आरसे

तीन आरसे 

1.लोकांना सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे याचे भान नाही. सर्व वर्गातल्या लोकांना तंबाखूचे घाणेरडे व्यसन आढळते. तंबाखू खाऊन कुठेही पचापचा थुंकतात. इमारतींच्या भिंती, कोपरे आणि रस्ते तंबाखूच्या डागांनी बरबटलेले आढळतात.

2.मलमूत्र विसर्जनाच्या बाबतीत नागरिक स्वच्छतेचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे रोगराईचा प्रसार होतो. दर वषी पाच लाख लोक विषमज्वराने पछाडले जातात.

3.खासदारांबद्दल काय बोलावे? संसदेत बसताना समोरच्या बाकाच्या पाठीवर बिनदिक्कतपणे पाय टेकून बसतात. काही जण तर पाय असे पसरून बसतात की जवळजवळ जमिनीला समांतरच असतात. कामकाजाचे गांभीर्य कोणाला नसते. महत्त्वाच्या प्रश्नांवर भाषणे व चर्चा चालू असताना खासदार आतबाहेर जात येत असतात. आपापसात हसणे, बोलणे आणि खोकणे चालू असते. या गोंधळातच मंत्र्यांना प्रश्न विचारले जातात आणि त्यांची उत्तरे मिळतात. पण सर्वत्र गोंधळ चालू असतो.  

4.शहरात घर शोधताना नागरिक पोलीस चौकीजवळ घर शोधण्याचा प्रयत्न करतात. शहरातले काही भाग चोऱया, मारामाऱया, खूनबाजी यांनी ग्रस्त आहेत. सामान्य माणसाला जगणे कठीण आहे. रस्त्यावरून जाताना केव्हा पाकीट मारले जाईल याची शाश्वती नाही. घराला कुलूप लावून बाहेरगावी जायचे असेल तर घरातल्या सामानाच्या सुरक्षिततेची काही तरी व्यवस्था करणे गरजेचे आहे.

उपरोक्त चार निरीक्षणे माझी नाहीत. सध्या गाजत असलेल्या मलाष्काची देखील नाहीत. एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमध्ये चार्ल्स डिकन्स नावाचा लेखक होऊन गेला. तो अमेरिकेच्या दौऱयावर असताना त्याला तंबाखू खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे लोक आढळले होते. लंडनचे नागरिक अस्वच्छ राहून रोगराई पसरवीत. 

डिकन्सच्या काकांचे ‘मिरर ऑफ पार्लमेंट’ नावाचे नियतकालिक होते. त्यात डिकन्स ‘मिरर ऑफ पार्लमेंट’ नावाचे सदर लिहीत असे. या सदरात त्याने खासदारांच्या वर्तनावर वरीलप्रमाणे लिहिले आहे. मात्र असे लिहिले म्हणून त्याच्यावर तिथल्या हक्कभंग समितीने कारवाई केली नाही किंवा त्याला कोणी देशद्रोही म्हणून हिणवले नाही हे तितकेच खरे. शहरातल्या गुन्हेगारीकरणावर आणि सामान्य माणसाच्या हाल अपेष्टांवर डिकन्सच्या मुलाने लेख लिहिला होता. त्यात लंडनच्या सामाजिक जीवनावर वरीलप्रमाणे भाष्य आले आहे. त्यावेळी मुंबईच्या तुलनेत लंडनची अवस्था कैकपटीनी वाईट होती. मलाष्काने जसे हे जाणून घ्यायला हवे तसेच कोणत्याही टीकेबद्दल लगेच हळवे होणाऱया नेत्यांनीही समजून घ्यायला हवे.

Related posts: