|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अंगणवाडी कर्मचाऱयांचा भव्य मोर्चा

अंगणवाडी कर्मचाऱयांचा भव्य मोर्चा 

ओरोस : अंगणवाडी कर्मचाऱयांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हय़ातील अंगणवाडी कर्मचाऱयांनी जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढला. मागण्या मान्य न झाल्यास सिंधुदुर्ग जिल्हय़ासह संपूर्ण राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी 11 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला.

     महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हय़ातील अंगणवाडी कर्मचाऱयांनी मंगळवारी ओरोस रवळनाथ मंदीर ते जिल्हा परिषद भवन अस भव्य मोर्चा काढला. या मोर्चामध्ये कर्मचारी सभेच्या तालुका प्रतिनिधी रोहिणी लाड (मालवण), पुंदना कावळे (सावंतवाडी), शालिनी तारकर (देवगड), मंगल राणे (कणकवली), गुलाब चव्हाण (दोडामार्ग), दीपाली पठाणी (कुडाळ), माधवी ठाकूर (वेंगुर्ले), अर्चना गांधी (वैभववाडी) आदी तालुका पदाधिकाऱयांसह जिल्हय़ातील अंगणवाडी सेविका, मदतनीस शेकडोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

            ओरोस रवळनाथ मंदीर ते जिल्हा परिषद असा मोर्चा धडकताच जि. प. प्रवेशद्वारावरच ओरोस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती जगताप व त्यांच्या सहकारी पोलिसांनी मोर्चाला रोखले. त्यानंतर शिष्टमंडळामार्फत जि. प. च्या महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांची भेट घेण्यात आली व विविध मागण्यांचे निवेदन सादर करून चर्चा करण्यात आली.

            केरळ, तामिळनाडू, हरियाणा, दिल्ली यासारख्या अनेक राज्यांमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीसांना जास्त मानधन दिले जाते. मात्र महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना अत्यंत कमी मानधन दिले जाते. ते वाढवून देण्यात यावे. तसेच अंगणवाडी पोषण आहाराची गेले आठ-नऊ महिने न आलेली बिले पर्यायी व्यवस्था म्हणून जि. प. फंडातून देण्यात यावीत, पोषण आहार साहित्य जिल्हास्तरावर खरेदी करून द्यावे, अंगणवाडी पेन्शनचे पैसे बऱयाचजणांना मिळाले, पण काहींना मिळाले नाही. त्रुटी तात्काळ दूर करून त्या देण्यात याव्यात, पूर्वी ठरल्याप्रमाणे रिटायर होण्यापूर्वीच त्यांना कल्पना द्यावी व पेन्शनसंबंधी कागदपत्रे पूर्ण करून द्यावीत. पूर्वीप्रमाणे पतसंस्था कर्ज हप्ते, एलआयसी हप्ते मानधनातून वजा करून संबंधिताकडे जावेत. संपलेली एक ते चार रजिस्टरे तातडीने छापून द्यावीत अन्यथा रेकॉर्ड लिहिणे कठीण जाणार आहे. अनेक ठिकाणी सुपरवायझर पदे रिक्त आहेत. अंगणवाडी सेविकांमधून ती ताबडतोब भरावीत, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्यावर जिल्हास्तरावरील मागण्या तातडीने सोडविण्यात येतील आणि शासन पातळीवरील मागण्यांबाबत शासनाला कळविण्यात येईल, असे रसाळ यांनी स्पष्ट केले.

Related posts: