|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » एमपीटीच्या विस्तार प्रकल्पास परवाना नाही

एमपीटीच्या विस्तार प्रकल्पास परवाना नाही 

प्रतिनिधी/ पणजी

वास्को शहर कोळसा प्रदूषणातून पूर्णपणे मुक्त झाल्याशिवाय मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या (एमपीटी) कोणत्याही विस्तार प्रकल्पास किंवा वाढीव कोळसा आयातीस परवाना दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत स्पष्ट केले. प्रदूषण कमी व्हावे म्हणून कोळसा आयात 25 टक्के कमी करण्यात आली असून त्याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. या संदर्भात केंद्र सरकारला अर्थात केंद्रीय पर्यावरण-वन मंत्रालयास पत्र पाठविणार असल्याचेही ते म्हणाले.

आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी वास्को शहर ‘कोळसा हब’ करण्यास परवानगी दिली की काय? असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना पर्रीकर बोलत होते.

… तर हस्तक्षेपाशिवाय पर्याय नाही

ते म्हणाले की, वास्को शहर आणि तेथील जनतेचे हित जपणे महत्त्वाचे आहे. हा प्रश्न केंद्रीय व राज्य प्रदूषण मंडळाच्या अखत्यारित येतो. ती मंडळे म्हणजे स्वायत्त संस्था असल्याने त्यांना सरकार थेट निर्देश देऊ शकत नाही, परंतु मंडळाने उपाययोजना सुचवून – करूनही प्रदूषणाची पातळी कमी होत नसेल तर सरकारला हस्तक्षेप करण्याशिवाय पर्याय नाही, असेही पर्रीकर यांनी नमूद केले.

आयआयटीतर्फे प्रदूषणाची तपासणी

कोळसा आयात 25… कमी करूनही जर प्रदूषण कमी होत नसेल तर आयात 50 टक्क्यांनी कमी करण्यात येईल. त्यानंतरही जर प्रदूषणाची पातळी कमी होत नसेल तर कोळसा हाताळणी – वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागेल असा गर्भित इशारा पर्रीकर यांनी एमपीटीला दिला. जिंदाल, अदानी यासारख्या कंपन्यांनी कोळसा वाहतूक हाताळणी करताना प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. आयआयटीतर्फे येत्या ऑक्टोबर महिन्यात वास्कोतील कोळसा प्रदूषणाची तपासणी करण्यात येईल असे पर्रीकर म्हणाले.

वास्को कोळसा ‘हब’ होणार नाही

कोळसा प्रदूषण पूर्णपणे नाहीसे करण्यासाठी एमपीटी तसेच कोळसा हाताळणी करणाऱया कंपन्यांनी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याची गरज आहे, परंतु ते करायला कोणी तयार नाही, कारण त्याला कोटय़वधीचा खर्च आहे, अशी माहिती पर्रीकर यांनी दिली. लॉरेन्स यांच्यासह एलिना साल्ढाणा यांनी कोळसा प्रदूषणावर अनेक उपप्रश्न केले. प्रदूषण मंडळाने याप्रकरणी टिळक मैदानावर पर्यावरण सुनावणी घेतली. इतर उपाययोजना केल्याचे सांगून वास्को शहर ‘हब’ होणार नाही याची दक्षता सरकार घेईल असे ते म्हणाले.

 

Related posts: