|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » तीन विभागांच्या ताळमेळा अभावी अडकले ‘ग्रामरक्षक दल’!

तीन विभागांच्या ताळमेळा अभावी अडकले ‘ग्रामरक्षक दल’! 

शासन निर्णयाच्या 2 महिन्यानंतरही जिल्हय़ात एकाही दलाची स्थापना नाही

वाढत्या व्यसनाधिनतेला आळा घालण्यासाठी योजना

महसूल, उत्पादन शुल्क, जिल्हा परिषद यांच्यावर जबाबदारी

ग्रामसभा घेऊन ‘ग्रामरक्षक दल’ स्थापण्याचे आदेश

दीपक कुवळेकर /देवरुख

वाढत्या व्यसनाधिनतेला आळा घालण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीमध्ये ‘ग्रामरक्षक दलाची’ स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी ग्रामसभा घेवून ग्रामरक्षक दल स्थापन करायचे सूचित करण्यात आले आहे. मात्र, शासनाच्या या निर्णयाला दोन महिने होवूनही जिल्हय़ात एकाही ग्रामपंचायतीमध्ये हे दल स्थापन झालेले नाही. हे दल स्थापण्याची जबाबदारी महसुल विभाग, जि. प. ग्रा. पं. विभाग व दारु उत्पादन शुल्क यांच्यावर देण्यात आली आहे. मात्र विभागांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे हे दल कागदावरच राहिले आहे.

शासन निर्णयानंतर ग्रामरक्षक दलाची स्थापना करुन जिल्हय़ात दारुबंदी होण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचे आदेश शासनाने दिले होते. ग्रामरक्षक स्थापनेसाठी प्रांताधिकाऱयांकडे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत अर्ज सादर करावा लागतो. जिल्हय़ात एकुण 845 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी एकाही ग्रामपंचायतीने या उपक्रमासाठी अद्याप अर्ज केलेला नाही.

ग्रामदल स्थापनेचा निर्णय ग्रामसभेत घेताना एकुण मतदारांच्या किमान 50 टक्के मतदारांची उपस्थिती आवश्यक केली होती. मात्र 50 टक्के देखील मतदार उपस्थित राहत नसल्याचे वारंवार दिसून आले. यामुळे अनेक सभा वारंवार कोरम अभावी तहकुब होण्याचे प्रमाण वाढले. ही 50 टक्केची अट शिथिल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार आता 25 टक्के मतदारांची उपस्थिती असा नवा निकष तयार करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे आता ग्रामसभेच्या कामकाजाला वेग येणार आहे.

ग्रामरक्षक दलाच्या स्थापनेच्या प्रकियेत महसूल विभागाच्या अधिकाऱयांचा समावेश करु नये. यासाठी राज्यात अघोषित असहकार पुकारण्यात आला होता. मात्र शासनाने निर्णयात काही बदल केल्याने हा विरोध काही प्रमाणात कमी झाला. मात्र काही ठिकाणी ग्रामरक्षक दल स्थापन करण्यामध्ये याचा फटका बसत आहे.

जिल्हय़ात 845 ग्रामपंचायती असून विशेष म्हणजे यातील एकाही ग्रामपंचायतीने अद्याप अर्ज केलेला नाही. हा अर्ज का केला नाही. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. मुळात हे दल स्थापन करण्याबाबत अनेक ग्रामपंचायतींना माहितीच नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत ग्रामपंचायत विभागाशी संपर्क साधला असता, दारु उत्पादन शुल्क विभागाकडून याबाबत गेल्या महिन्यात पत्र आले आहे. मात्र हे पत्र पंचायत समितीकडे पाठविण्यात आले आहे असे सांगण्यात आले आहे. 15 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे हा विषय या सभेमध्ये घेता येवू शकतो. मात्र यावरील पंचायत समिती तसेच महसूल विभागाकडून तसे आदेश ग्रामपंचायतीला देणे महत्त्वाचे आहे.

या ग्रामरक्षक दल स्थापन करण्याबाबत कोणत्या विभागाने पुढाकार घ्यायचा यामध्ये हे दल अडकले आहे. कारण महसुल विभाग, जि. प. व दारु उत्पादन शुल्क या तिन विभागामध्ये ताळमेळ नसल्याने जिल्हय़ात आतापर्यंत एकही ग्रामरक्षक दल स्थापन झालेले नाही.

 

तालुका ग्रामपंचायतीची संख्या
मंडणगड 49
दापोली 106
खेड 114
चिपळुण 130
गुहागर 65
संगमेश्वर 126
रत्नागिरी 94
लांजा 60
राजापूर 101
एकुण 845

Related posts: