|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजी, वाळपईसाठी 23 ऑगस्टला पोटनिवडणूक

पणजी, वाळपईसाठी 23 ऑगस्टला पोटनिवडणूक 

प्रतिनिधी /पणजी :

पणजी आणि वाळपई विधानसभा मतदारसंघासाठीच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या असून दोन्ही मतदारसंघात निवडणुका गणेश चतुर्थीपूर्वी 23 ऑगस्ट रोजी होतील. मात्र मतमोजणी ऐन गणेश चतुर्थीतच 28 ऑगस्ट रोजी होईल. या घोषणेनंतर संपूर्ण गोव्यात आचारसंहिता लागली असून त्यात कोणतीही महत्त्वाची घोषणा करता येणार नाही. मात्र विधानसभा अधिवेशनावर त्याचा परिणाम होणार आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासाठी पणजी मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा दिलेले सिद्धार्थ कुंकळकर आणि वाळपई मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झालेले विश्वजित राणे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा देऊन नंतर भाजपमध्ये प्रवेश केल्याने पणजी व वाळपई या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. निवडणूक आयोगाने नवी दिल्लीहून देशातील काही रिक्त झालेल्या मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर केल्या. त्यात गोव्यातील पणजी व वाळपई या दोन मतदारसंघाचा समावेश आहे. गुरुवारी पोटनिवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर आदर्श आचारसंहिता संपूर्ण गोव्यासाठी लागू करण्यात आली आहे.

उद्यापासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ

दि. 29 जुलै रोजी अधिसूचनेद्वारे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होईल. 5 ऑगस्ट हा उमेदवारी अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस आहे. 7 ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्जावर छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस 9 ऑगस्ट असून 23 ऑगस्ट रोजी निवडणुका घेतल्या जातील.