|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गुडे शिवोलीतील शाळेची जीर्ण इमारत धोकादायक

गुडे शिवोलीतील शाळेची जीर्ण इमारत धोकादायक 

वार्ताहर/ शिवोली

गुडे शिवोली येथील काळोबा देवस्थानजवळ असलेल्या सरकारी प्राथमिक शाळेची जीर्ण झालेली इमारत पाडण्याची मागणी गुडेवासियांतर्फे जोर धरू लागली आहे. सदर शाळा संपूर्ण जीर्ण झाली असून स्लॅबच्या आत असलेल्या लोखंडी सळय़ा पूर्णतः गंजलेल्या आहेत. त्यामुळे इमारतीचे मोठमोठे स्लॅबचे तुकडे कोसळून पडू लागले आहेत. ही इमारत विनावापर असल्याने ती निर्लेखित करून त्याजागी अन्य लोकोपयोगी प्रकल्प उभारावा, अशी मागणी येथील रहिवासी निलेश वेर्णेकर यांनी  केली.

अनेक वर्षापासून देखभाल नाही

गुडे भागातील लोकांची शाळेची मागणी लक्षात घेऊन 50 वर्षापूर्वी काळोबा देवस्थानाजवळ ही इमारत उभी करण्यात आली होती. शिवोलीतील लोकसंख्या नंतर वाढू लागल्याने येथे खासगी शाळाही सुरू झाल्या. कालांतराने या शाळेत येणाऱया विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने शाळेच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला. खाजगी शाळांमुळे अखेर ही शाळा बंद पडली. तेव्हापासून या शाळेच्या इमारतीकडेही दुर्लक्ष झाले आहे. गेली कित्येक वर्षे या इमारतीची देखभाल व डागडुजी झालेली नाही. त्यामुळे इमारतीची दुर्दशा झाली आहे. आता ही इमारत कोणत्याहीक्षणी कोसळण्याची शक्यता असून ती तात्काळ निर्लेखिन करून पाडण्यात यावी, अशी मागणी मार्ना-शिवोली पंचायतीचे पंच महेश गोवेकर यांनी केली आहे.

लहान मुलांच्या जिवीतास धोका

 शाळेची सध्याची एकंदरीत पाहणी केली तर शाळेची इमारत कधीही कोसळू शकते अशी परिस्थिती आहे. शाळेच्या आजुबाजूला घरे असल्यामुळे या घरातील लहान मुले शाळेभोवती असलेला खुल्या जागेत खेळण्यासाठी येत असतात. शाळेचे स्लॅब कोणत्याहीक्षणी कोसळत असल्याने खुल्या जागेत खेळणाऱया मुलांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे. कधीकधी रात्रीच्या वेळी शाळेच्या इमारतीचा स्लॅबचा एखदा तुकडा कोसळत असतो. त्यामुळे होणाऱया मोठय़ा आवाजाने आजूबाजूला राहणाऱया कुटुंबाना त्रास सहन करावा लागत आहे. अंगणवाडी व उपआरोग्य केंद्र या भागात स्थलांतरीतसुद्धा करता येते. तसेच गावातील ग्रामस्थांच्या सोईसाठी समाजसभागृह, वाचनालय, व्यायामशाळा तसेच संगणक, शिवणकाम, आदी विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्ग असे लोकोपयोगी प्रकल्प सुरू करावेत, अशी मागणी पंचसदस्य महेश गोवेकर यांनी यावेळी केली.

पटसंख्या कमी झाल्याने शाळा बंद : आनंद घाटवळ

या शाळेची इमारत स्व. भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री असताना बांधण्यात आली होती. शाळेत सातवीपर्यंतचे वर्ग घेण्यात येत होते, असे आनंद घाटवळ यांनी सांगितले. गुडे भागात अंदाजे तीन ते चार हजार लोकांची वस्ती आहे. त्याकाळी स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी संपूर्ण गोव्यात सरकारी शाळा सुरू करण्याचे धोरण अवलंबविले होते. याच धोरणाअंतर्गत ही शाळा बांधण्यात आली होती. एकेकाळी विद्यार्थ्यांनी गजबजून जाणारी ही शाळा आज भग्नावस्थेत आहे. या इमारतीच्या जागी एखादा लोकोपयोगी प्रकल्प सुरू झाल्यास विकासाला हातभार लागेल, असेही घाटवळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राय येथे झाले मतदान

पूर्वी सदर शाळा मतदानासाठी वापरण्यात येत होती. हल्लीच झालेले विधानसभा व पंचायतीचे मतदान आम्हाला शिवोली-राय येथे दीड किलोमीटर पर्यंत चालत जावून करावे लागले त्यामुळे लोकांना खासकरुन ज्येष्ठ नागरिकांना असंख्या यातना सोसव्या लागल्या. निवडणूक अधिकाऱयांनीसुद्धा सदर शाळेचा उपयोग टाळला त्यामुळे सरकाराने व स्थानिक आमदार तथा जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी गंभीरपणे लक्ष घालून त्वरित काम हाती घेण्याची मागणी श्यामसुंदर चोडणकर यांनी केली