|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भाजप-संघ नेत्यांसोबत विजयन यांची चर्चा

भाजप-संघ नेत्यांसोबत विजयन यांची चर्चा 

केरळमधील हिंसाचाराचा मुद्दा : 6 रोजी सर्वपक्षीय बैठक

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

 केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर सुरू असलेल्या हिंसक घटनांदरम्यान सोमवारी मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि भाजप-संघाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एक बैठक झाली. यात हिंसेला आळा घालणे आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्यावर सहमती दर्शविण्यात आली.

ही बैठक विजयन यांनी बोलाविली होती आणि यात 6 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात भाजपचे केरळ अध्यक्ष के. राजशेखरन, माजी केंद्रीय मंत्री ओ. राजगोपाल, आमदार तसेच संघ नेते पी. गोपालनकुट्टी आणि माकप राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन उपस्थित होते.

शांतता प्रस्थापित करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये भाजप तसेच संघ शक्य ती सर्व मदत करेल. राज्यात शांतता असावी, राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटनांना आपले कार्यक्रम राबविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळावे असे राजशेखरन यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले. शांतता कायम राहण्यासाठी सरकारने राज्यात आवश्यक वातावरणनिर्मिती करावी. पोलिसांनी अशा प्रकरणांमध्ये पूर्णपणे निष्पक्ष असावे अशी मागणीही त्यांनी केली. याचदरम्यान कोट्टायम येथे हिंसाचाराच्या नव्या घटनांमध्ये संघाच्या जिल्हा कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. तर माकपच्या सीटू या संघटनेच्या जिल्हा समिती कार्यालयावर दगडफेक झाली. भाजपने संघ कार्यालयावरील हल्ल्यासाठी माकप कार्यकर्त्यांना जबाबदार ठरविले.