|Monday, June 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गोरक्षकांवरून संसदेत गदोराळ

गोरक्षकांवरून संसदेत गदोराळ 

जमावाकडून होणाऱया हत्येच्या मुद्यावरून काँग्रेस आक्रमक

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

संसदेत सोमवारी विरोधकांनी मोदी सरकारला अनेक मुद्यांवरून घेरण्याचा प्रयत्न केला. गुजरातमधील आमदारांचा कथित घोडेबाजार आणि झुंडकडून होणाऱया हिंसाचाराच्या मुद्यावर विरोधकांनी थेट सरकारवरच आरोप केले. “हिंदुस्थानला लिंचिस्तान करू नका, सरकार अप्रत्यक्षपणे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासारख्या संघटना आणि गोरक्षकांना समर्थन देत असल्याचा आरोप लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. तर राज्यसभेत काँग्रेसने पोलिसांनी आमदारांचे अपहरण केल्याचा आरोप करत भाजपने घोडेबाजार चालविल्याचे म्हटले.

काँग्रेसकडून झालेल्या आरोपानंतर भाजपने देखील प्रत्युत्तर दिले. जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस अधिकारी अयूब पंडिता यांना जमावाकडून ठार करण्यात आल्याच्या घटनेला यात सामील करू नये का असा विरोधकांना बोचरा प्रश्न खासदार हुकुम नारायण यादव यांनी उपस्थित
केला.

झुंडकडून होणाऱया हिंसाचाराची पंतप्रधान मोदींनी निंदा केल्याचेही त्यांनी
म्हटले.

मध्यप्रदेश आणि झारखंड येथे जमावाद्वारे हिंसाचाराच्या घटनांचे प्रमाण अधिक असून मोदी सरकार दलित, अल्पसंख्याकांना आणि महिलांना लक्ष्य करत आहे. पंतप्रधानांनी सभागृहात येत या मुद्यावर सरकारची भूमिका मांडावी अशी विरोधकांची मागणी असल्याचे खर्गे यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान म्हटले. यावर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ज्या प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला, ती न्यायालयात प्रलंबित असल्याने यावर चर्चा का होतेय असे वक्तव्य
केले.

गोरक्षकांवर किती गुन्हे नोंदविण्यात आले आणि किती जणांना अटक झाली हे सरकारने सांगावे. सरकार अशा आरोपींबाबत अंग झटकत असले तरी त्यांच्याविरोधात कारवाई मात्र करणे जाणीवपूर्वक टाळले जाते. भाजप आपली विचारधारा लोकांवर थोपविण्याचा प्रयत्न करत असल्याने हा हिंसाचार होतोय, देशात लोकशाही आहे की नाही हे देखील लोक विचारू लागल्याचा दावा खर्गे यांनी
केला.