|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » यावषीचा गणेशोत्सव अंधारात?

यावषीचा गणेशोत्सव अंधारात? 

 

कायद्याच्या चौकटीत राहूनच डॉल्बीला परवानगी द्या : अन्यथा कोणत्याही मंडळाला साहित्याचा पुरवठा होणार नाही

प्रतिनिधी / बेळगाव

डॉल्बीला कायद्याच्या चौकटीत राहून परवानगी द्या. या व्यवसायावर आज दोन ते अडीच हजार लोक आपली उपजिविका चालवत आहेत. त्यामुळे पूर्णपणे बंदी न आणता मागील वर्षाप्रमाणे 2 बेस, 2 टॉप लावण्याची परवानगी द्यावी, अन्यथा गणेशोत्सवासाठी कोणत्याही मंडळाला स्पीकर, माईक, जनरेटर, इतर साऊंड सिस्टीम, विद्युत सिस्टीम देणार नाही, असा इशाराच डॉल्बी मालक असोसिएशनने दिला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अंधारात साजरा करावा लागणार का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

पोलीस आयुक्तांनी डॉल्बीवर पूर्णपणे बंदी आणावी, असा आदेश दिला आहे. डॉल्बी लावल्याने ध्वनी प्रदूषण नक्कीच होते. परंतु त्यावर पूर्णपणे बंदी आणणे हा पर्याय होऊ शकत नाही. कायद्याच्या चौकटीत राहून 100 डेसिबलपेक्षा कमी आवाज असणाऱया दोन बेस व दोन टॉपना परवानगी द्यावी, अशी मागणी असोसिएशन करीत आहे.

मिरवणुकीमध्ये इतर वाद्यांच्या आवाजाइतकाच आवाज डॉल्बीचा असतो. पारंपरिक वाद्यांना परवानगी दिली जाते. मग डॉल्बीला का नाही? आज डॉल्बीचा व्यवसाय शहरात मोठय़ा प्रमाणात पसरला आहे. शहरात 240 लहान-मोठय़ा डॉल्बी आहेत. या प्रत्येक डॉल्बीवर चार ते पाच कामगार काम करत असल्याने अनेकांच्या रोजगाराचे ते साधन बनले आहे. डॉल्बीवर बंदी आणल्यास या कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

डॉल्बीसाठी एकच नियम ठरवा

स्थानिक डॉल्बी चालकांवर मर्यादित आवाज ठेवण्यासाठी निर्बंध घातले जातात. परंतु सरकारी कार्यक्रमांना मात्र बाहेरील राज्यांतून डॉल्बी मागविली जाते. त्या डॉल्बीवर सात ते आठ बेस व टॉप बसविण्यात आलेले असतात. मात्र त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने डॉल्बीवरील निर्बंध नेमके कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित होतो.

मागील वर्षाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा

मागील वषी आयुक्त अनुपम अगरवाल यांनी दोन बेस, दोन टॉपची परवानगी डॉल्बीसाठी दिली होती. त्यामुळे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये कायद्याच्या चौकटीत राहून डॉल्बी लावण्यात आली होती. परंतु यावषी पूर्णपणे बंदी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मागील वर्षाच्याच निर्णयाची अंमलबजावणी करावी, या मागणीचे निवेदन डॉल्बी असोसिएशनने जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

 कायद्याच्या चौकटीत राहून डॉल्बी लावण्यास तयार-

 स्वप्निल बेळवटकर (अध्यक्ष डॉल्बी असोसिएशन)

दरवषी दारुच्या व्यसनापायी अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. मग सरकारने दारु बंद केली आहे का? डॉल्बीवर बंदी आणण्यास आमचा विरोध नाही, आम्ही सरकारच्या नियमानुसार कायद्याच्या चौकटीत राहून डॉल्बी लावण्यास तयार असल्याने सरकारने याचा फेर विचार करावा.