|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » बँक खाते पोर्टेबिलिटीच्या कामाला पुन्हा सुरुवात

बँक खाते पोर्टेबिलिटीच्या कामाला पुन्हा सुरुवात 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बँक खात्यांच्या पोर्टेबिलिटी कामाला पुन्हा सुरुवात करण्यासाठी बँकांना आदेश देण्यात आल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांनी सांगितले. ते सोमवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. बँकिंग क्षेत्रात स्पर्धा वाढविणे आणि ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी अनेक निर्णय घ्यावे लागतात. नवीन पिढीतील ग्राहकांना अधिक पर्याय देण्यासाठी बँकांकडून प्रयत्न करण्यात यावेत. आताची पिढी तंत्रज्ञानप्रेमी आहे. सध्याच्या वातावरणात खातेदार जर बँकांकडून मिळत असलेल्या सेवेवर समाधानी नसेल तर त्याला दुसऱया बँकेचा पर्याय निवडण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी बँकिंग लोकपालच्या वार्षिक संमेलनात म्हटले.

बँक खाते पोर्टेबिलिटी सेवा सुरू करण्यात आल्याने ग्राहकांना आपला खाते क्रमांक तोच ठेवत दुसऱया बँकेकडे जाता येईल. यातील खात्याच्या व्यवहाराचा इतिहास कायम राहणार आहे. यामुळे बँका आपल्या सेवेमध्ये सुधारणा करतील असा अंदाज आहे. चांगली सेवा मिळणाऱयाच बँकांना ग्राहकांकडून निवडण्यात येईल. देशात बँक खातेधारकांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याच तुलनेत बँकाविरोधातील तक्रारी वाढत आहेत.

सध्या इन्ट्रा बँक पोर्टेबिलिटीची सुविधा आहे, म्हणजेच एकाच बँकेच्या दुसऱया शाखेत खाते स्थलांतर करता येते. सध्या विमा आणि मोबाईल क्रमांकासाठी ही सुविधा लागू असून लवकरच बँक क्षेत्रातही लागू झाल्याचे दिसेल.