|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पत्रकार हा समाजाचा आरसा

पत्रकार हा समाजाचा आरसा 

प्रतिनिधी/ फोंडा

पत्रकार व साहित्यिक हा समाजाचा आरसा असतो. समाजातील बऱया वाईट घटनांचे प्रतिबिंब त्याच्या लेखणीतून उमटत असते. समाजातील चळवळींना गती देण्याचे कार्य प्रसार माध्यमे करीत असतात. त्यामुळे लोकशाहीतील तो महत्त्वाचा घटक असतो, असे उद्गार कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी काढले. फोंडा पत्रकार संघ आणि अंत्रुज पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने फोंडा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारदिन सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फोंडय़ाचे आमदार रवी नाईक तर खास निमंत्रित म्हणून गायक कलाकार रघुनाथ फडके तसेच सत्कारमूर्ती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे कर्मचारी धनंजय गाड केरकर, रामदास नाईक, ज्येष्ठ पत्रकार श्रीधर वेरेकर, फोंडा पत्रकार संघाचे अध्यक्ष गोकुळदास मुळवी, अंत्रुज पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र तारी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मंत्री गोविंद गावडे यांनी दोन्ही पत्रकार संघातर्फे राबविण्यात येणाऱया उपक्रमांची प्रशंसा केली. पत्रकारांनी नेहमीच सत्याची बाजू मांडावी असे रवी नाईक म्हणाले. पत्रकारांनी दबावाखाली काम न करता अन्यायाविरुद्ध लेखणी चालवावी, असे सांगून पत्रकारांवर होणारे हल्ले ही लोकशाहीच्यादृष्टीने चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले.

नारायण नावती यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन रघुनाथ फडके यांच्याहस्ते तर धनंजय केरकर यांचा रवी नाईक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. रामदास नाईक यांना मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले. नारायण नावती व इतर दोन्ही सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्याहस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील पत्रकार व पत्रकार मित्रांना भेटवस्तू देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक गोकुळदास मुळवी यांनी तर नरेंद्र तारी यांनी सत्कामूर्तींचा परिचय करुन दिला. निलेश नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

आनंदीबाई हायस्कूल समूहगीत स्पर्धेत प्रथम

तत्पूर्वी फोंडा तालुका आंतरशालेय समूहगीत गायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन फोंडा पालिकेचे उपनगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांच्याहस्ते करण्यात आले. व्यासपीठावर परीक्षक धर्मानंद गोलतकर, दुर्गाकुमार नावती व अंत्रुज पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र तारी हे उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक नरेंद्र तारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सचिव सदानंद सतरकर यांनी तर निलेश नाईक यांनी आभार मानले. या स्पर्धेत आनंदीबाई नाईक हायस्कूल करंजाळ यांना प्रथम, सरकारी हायस्कूल सदर, फोंडा यांना द्वितीय तर नवदुर्गा हायस्कूल मडकई यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. दादा वैद्य हायस्कूल, कुर्टी, डॉ. सखाराम गुडे हायस्कूल शिरोडा, लोकमान्य विद्यालय, कवळे, महालक्ष्मी हायस्कूल, तळावली व गणनाथ हायस्कूल, निरंकाल यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त झाली.

Related posts: