|Monday, August 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सिंधू जल करार : भारताला मोठे यश

सिंधू जल करार : भारताला मोठे यश 

ऊर्जा प्रकल्पांच्या निर्मितीसाठीचा मार्ग मोकळा : जागतिक बँकेची अनुमती

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

सिंधू जल करार अंतर्गत पश्चिमवाहिनी नद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारण्याची भारताला अनुमती असल्याचे जागतिक बँकेने स्पष्ट केल्याने भारताला मोठे यश मिळाले आहे. भारताच्या दोन प्रकल्पांच्या आराखडय़ावर पाकिस्तानने आक्षेप घेतला होता. प्रकल्पांच्या तांत्रिक मुद्यावर दोन्ही देशांमध्ये सचिव स्तरावर बोलणी झाली.

ही बोलणी सहकार्याच्या वातावरणात पार पडल्याचे सांगत जागतिक बँकेने दोन्ही देश चर्चा पुढे कायम ठेवण्यास सहमत असून पुढील टप्प्यातील बोलणी वॉशिंग्टनमध्ये सप्टेंबरमध्ये होतील असे स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरमधील किशनगंगा आणि रातले जलविद्युत प्रकल्पांच्या आराखडय़ावर हरकत घेत पाकिस्तानने मागील वर्षी जागतिक बँकेकडे धाव घेतली होती. किशनगंगा प्रकल्प झेलमची उपनदी तर रातले प्रकल्प चिनाब नदीशी संबंधित आहे. करारात या दोन्ही नद्यांसोबत सिंधू नदीला पश्चिमवाहिनी नदी म्हणून उल्लेख आहे. या नद्यांच्या पाण्याच्या वापरावर पाकचे कोणतेही बंधन भारतावर लागू नाही. भारत ज्याप्रकारात या नद्यांच्या पाण्याचा वापर करू शकतो, त्यात जलविद्युत प्रकल्प उभारणीची अनुमती असल्याचे जागतिक बँकेने  पत्रकात नमूद केले.

57 वर्षे जुन्या या करारावर मागील वर्षी प्रश्न उपस्थित होऊ लागले. सीमेपलिकडून होणाऱया दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्त आणि पाणी एकत्रित वाहू शकत नाही असे अत्यंत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले होते. करारांतर्गत नद्यांमधून मिळणाऱया पाण्याचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याचा निर्णय भारताने घेतल्याने पाकची अडचण झाली आहे.