|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तीन दुरुस्ती विधेयके विधानसभेत दाखल

तीन दुरुस्ती विधेयके विधानसभेत दाखल 

प्रतिनिधी/ पणजी

राज्याचे माहिती तंत्रज्ञान धोरण निश्चित करणे, माहिती तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देणे इत्यादी सर्वसमावेशक असे गोवा माहिती तंत्रज्ञान विकास दुरुस्ती विधेयक सभागृहात दाखल झाले. त्याचबरोबर माडाला राज्यवृक्षाचा दर्जा देणे आणि शहरांना हायवेमधून वगळून राज्यातील बारना संरक्षण देण्यासंदर्भातील तीन दुरुस्ती विधेयके राज्य विधानसभेत दाखल करण्यात आली.

गोवा फॉरवर्डने केलेल्या मागणीनुसार गोवा सरकारने माडाला राज्यवृक्षाचा दर्जा देतानाच या कल्पवृक्षाला आता व्यावसायिक उत्पादन देणारे झाड, असे म्हटले जाईल व कृषी खात्यांच्या अखत्यारित हे झाड येईल. तसेच एखादा जुना व फळे न धरणारा माड कापावयाचा असल्यास कृषी अधिकाऱयाकडे तशी परवानगी घ्यावी लागेल. त्याचबरोबर जो कल्पवृक्ष कापला जाईल, त्या जागी नव्या माडाचे रोपटे लावावे लागेल, अशी तरतूद या कायद्यात केलेली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हे विधेयक सभागृहात दाखल केले.

बारना संरक्षण देणारे गोवा महामार्ग दुरुस्ती विधेयक

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशामुळे राज्यातील अनेक बार बंद पडू लागलेत. त्यामुळे सर्व नगरपालिका आणि पणजी महापालिका यांना महामार्गातून वगळण्याचा अधिकार सरकारला प्राप्त करून देणारे गोवा महामार्ग दुरुस्ती विधेयक सा. बां. खा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत सादर केले. सोमवारी या विधेयकावर मतदान होईल.

माहिती तंत्रज्ञान विधेयक

माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांनी शुक्रवारी सादर केलेल्या गोवा माहिती तंत्रज्ञान विकास दुरुस्ती विधेयकातून राज्य सरकारला माहिती तंत्रज्ञान धोरणाची अंमलबजावणी करण्याची संधी प्राप्त होईल. त्याचबरोबर राज्यात माहिती तंत्रज्ञान उद्यान, माहिती तंत्रज्ञानाची एक वसाहत निर्माण करणे तसेच यासंदर्भात अनेक योजना आखणे सरकारला शक्य होईल. राज्यात माहिती तंत्रज्ञान विकासाकरिता पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा सरकारचा इरादा आहे. या दुरुस्ती विधेयकाद्वारे सरकारला आपल्या धोरणाची अंमलबजावणी करण्यास बळकटी प्राप्त होईल.