|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आधी झाडे लावा, मग गाडय़ा चालवा

आधी झाडे लावा, मग गाडय़ा चालवा 

पायी विश्वभ्रमंतीवर निघालेल्या ध्येयवेडय़ांचा संदेश

प्रतिनिधी/ पणजी

कार, दुचाकी अथवा कोणतेही वाहन खरेदी करायचे असल्यास किंवा वाहनचालक परवाना, वाहन परमीट घ्यायचे अथवा नुतनीकरण करायचे असल्यास आधी किमान 5 झाडे लावावी लागतील असा कायदा गोव्यातही करावा अशी मागणी करीत तीन ध्येयवेडे विश्वभ्रमंतीसाठी निघालेले पर्यावरण प्रेमी गोव्यात पोहोचले असून मुख्यमंत्री तथा राज्यपालांची भेट घेऊन ते आपले निवेदन सादर करणार आहेत.

गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड लिमका बुक ऑफ रिकॉर्ड इंडिया स्टार बुक ऑफ रिकॉर्ड अशी अनेक दिग्गज मानांकने प्राप्त झालेल्या या तरुणांनी पायी चालत विश्वभ्रमंती करण्याचा संकल्प केला आहे. 11 देशात तसेच भारताच्या कानाकोपऱयात पायी चालत त्यांनी आतापर्यंत 3 लाख 38 हजार किलोमिटरचे अंतर कापले आहे. वाटेत जाताना ते पर्यावरण वाचवण्याचा वृक्ष लागवड करण्याचा संदेश देत आहेत.

वाहन खरेदी करणाऱयांना आधी झाडे लावण्याची सक्ती करणारा कायदा करण्यास त्यांनी थायलंड सारख्या देशाचे तसेच गुजरात आणि दिल्ली सरकारचे यशस्वीरित्या मन वळविले. आता असा कायदा गोव्यातही व्हावा अशी मागणी करीत ते गोव्यात पोहोचले आहेत.

36 वर्षांपासून पदभ्रमण

या तिघापैकी अवध बिहारी लाल यांनी ही पदयात्रा 36 वर्षापूर्वी 1980 सालापासून सुरु केली. वाटेत प्रचार करता करता त्यांनी अनेक सहकारी जोडले. काहींनी मोहीम सोडलीही. आता एकुण 20 सदस्य विश्वभ्रमणासाठी पायपीट करीत आहेत. पहिली 15 वर्षे ते एकटेच पायपीट करीत होते. या 20 सदस्यामध्ये 4 मुलीही आहेत. या सर्वांनी या ध्येयासाठी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले आहे. परत घरी कधीच जायचे नाही. शेवटच्या श्वासापर्यंत पदभ्रमण करायचे व शेवटी मृतदेह वैद्यकीय शैक्षणिक संस्थेला दान करायचा असा संकल्प त्यांनी केलेला आहे.

अवध बिहारी लाल यांच्यासोबत असलेले दोघे तरुण जितेंद्र प्रताप व महेंद्र प्रताप यांनी 1995 पासून या मोहिमेत भाग घेतला.

9.50 कोटी वृक्षांची लागवड

दरी खोऱयातून, रानावनातून बर्फाळ प्रदेश दलदल ओलांडून त्यांनी कानाकोपरा गाठला. तेथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व वृक्ष लागवड केली. आतापर्यंत त्यांनी झाडे नऊ कोटी वृक्षांची लागवड केली आहे.

ज्या जिल्हय़ात ते जातात तेथील जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन ते कार्यक्रम ठरवतात. वनखात्यामार्फत झाडे घेऊन वृक्षारोपण करतात. शाळा कॉलेजात जाऊन मोहिमेचे उद्दिष्ट व अनुभव कथन करतात.

हेडगेवार विद्यालयात वृक्षारोपण

उत्तर गोव्यात त्यांनी कुजिरा बांबोळी येथील डॉ. के. ब. हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड केली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यवस्थापक सुभाष देसाई, प्राचार्य दीपक आमोणकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष औदुंबर शिंदे, शिक्षकवर्ग व विद्यार्थी हजर होते.

पाकिस्तानसह विविध देशात आलेला अनुभव त्यांनी विद्यार्थ्यासमोर कथन केला. चीनसारख्या देशात वाढत्या प्रदूषणामुळे नाकाला मास्क घालून फिरावे लागते म्हणून खंत व्यक्त केली.

फक्त पृथ्वीवरच जीवन आहे व ते वाचवण्यासाठी पर्यावरण वाचवणे हा एकमेव उपाय आहे व वृक्ष लागवड ही साधी व सोपी पद्धत आहे. ज्यांच्याकडे जागा नाही त्यांनी कुंडीत झाडे लावा, पण ‘झाडे लावा आणि जगवा’ असा संदेश त्यांनी यावेळी दिला. संपूर्ण भारत फिरुन झाल्यावर गोवा हा सर्वात सुंदर प्रदेश असल्याचे जाणवले असे सांगताना कचरामुक्त गोवा झाल्यास व आणखीन थोडी हिरवळ वाढल्यास गोवा हा जगातील सुंदर प्रदेश बनणार असे ते म्हणाले.

सोमवारपासून ते दक्षिण गोवा पादक्रांत करणार आहेत. तेथून चालत कारवारमार्गे कर्नाटकात प्रवेश करून कन्याकुमारीपर्यंत व नंतर रामेश्वरम येथे दर्शन घेऊन चेन्नईला जाणार आहेत. तेथून पुढे त्यांचा कोरीया दौरा सुरु होणार आहे.

Related posts: