|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » रस्ता रुंदीकरणासाठी फातोडर्य़ात ‘माडां’ची कत्तल

रस्ता रुंदीकरणासाठी फातोडर्य़ात ‘माडां’ची कत्तल 

प्रतिनिधी/ मडगाव

मडगाव रवींद्र भवन सर्कल ते आर्लेम जंक्शनपर्यत सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून रस्त्याच्या बाजूला असलेल्या माडांची मोठय़ा प्रमाणात कत्तल करण्यात आली आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाला प्रारंभ करताना एकही माड कापू दिला जाणार नाही. सर्व माड क्यवस्थित काढून त्याची पुन्हा लागवड केली जाणार असल्याची घोषणा स्थानिक आमदार तथा नगरविकासमंत्री विजय सरदेसाई यांनी केली होती. पण, ही घोषणा प्रत्यक्षात मात्र साकार झालेली नाही.

गोव्यात विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी गोवा फॉरवर्डने माडांचा विषय लावून धरला होता. उत्तर गोव्यात रस्त्याच्या बाजूचे माड कापू दिले जाणार नाही असा इशारा देत आंदोलन छेडण्यात आले होते. सांगे येथे ही एका प्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणात माड कापल्याचा आरोप झाल्याने, त्या ठिकाणी देखील विजय सरदेसाई यांनी धडक दिली होती. पण, आज त्यांच्याच मतदारसंघात बेधडक माडांची कत्तल करण्यात आल्याने, त्यांच्या ‘माड’ प्रेमाबद्दल संशय घेण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मडगाव रवींद्र भवन सर्कल ते आर्लेम जंक्शनपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला प्रारंभ करताना सुरुवातीला रस्त्याच्या दुतर्फा असलेले दहा ते पंधरा माड काढून ते एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटच्या ठिकाणी स्थलांतरीत केले होते. पण, त्यातील एकही माड तग (जीवंत) धरू शकला नव्हता. हे माड दगावल्याने काँग्रेस पक्षाने त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली होती.

गेल्या दोन दिवसांपासून फातोर्डा येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालय ते आर्लेम जंक्शनपर्यंतच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या माडांची सरळ कत्तल करण्यात आली आहे. आत्ता पावसाळय़ाचे दिवस असून हे माड व्यवस्थित काढून दुसरीकडे लावले असते तर त्यांनी तग धरली असती. पण, माड न कापण्याची घोषणा हवेत विरल्याने त्याची कत्तल झाली व हा फातोर्डा परिसरात चर्चेचा विषय बनून राहिला. अनेकांनी या मुद्दय़ावरून आमदार विजय सरदेसाईंवर तोंडसुख घेण्याची संधी मात्र सोडली नाही.

Related posts: