|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » माजी विद्यार्थी ही प्रशालेची ताकद!

माजी विद्यार्थी ही प्रशालेची ताकद! 

कुडाळ : कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील कुडाळ हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजच्या ‘मित्रांगण-एक मैत्रेय स्पंदन’ या प्रशालेच्या 1987-88 या दहावी बॅचच्या मित्रांच्या ग्रुपने बनविलेल्या अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावर्षी 14 मे रोजी प्रशालेच्या 1987-88 या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन झाले होते. त्याचवेळी आपण प्रशालेचे काहीतरी देणे लागतो, या भावनेने या माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या सध्याच्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण कसे उपलब्ध करता येईल, यासाठी अद्ययावत संगणक कक्ष बनवून देण्याचे ठरविले. त्याचे उद्घाटन प्रशालेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक का. आ. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे उपकार्याध्यक्ष भाई तळेकर, सहसचिव आनंद वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिरसाट, सदस्य सुरेश चव्हाण, रोटरी क्लब कुडाळचे अध्यक्ष डी. के. परब, कुडाळ तालुका पत्रकार संघ अध्यक्ष प्रमोद ठाकुर, मुख्याध्यापक कमलाकर अणावकर, उपमुख्याध्यापक राजकिशोर हावळ, उद्योजक प्रसाद दळवी, दीपक कदम, दीपक रांजणकर, मालवण लायनेस क्लबच्या अध्यक्षा मीना घुर्ये, शिक्षक प्रवीण भोगटे, संगणक तज्ञ प्राजित परब, अंकुश कुंभार, उद्योजक गजानन कांदळगावकर उपस्थित होते.

संगणक कक्षात विविध सुविधा

या संगणक कक्षात पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रम दाखविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या ‘ऑफ पिरीयड’साठीही संगणकाचा वापर करता येणार आहे. तसेच अध्ययन व अध्यापन प्रभावी होणार आहे.

शोभेची वस्तू बनता नये!

सामंत म्हणाले, माजी विद्यार्थी ही प्रशालेची ताकद आहे. तो शाळेकडे वळून पाहतो ही शाळेच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. त्यांनी बनविलेल्या या कक्षाचा वापर शिक्षकांनी पुरेपूर करावा. तो शोभेची वस्तू बनता नये.

प्रास्ताविक लक्ष्मण घाटे यांनी तर आभारप्रदर्शन जीवन बांदेकर यांनी केले. यावेळी 1987-88 बॅचचे शिल्पा वर्दम, आनंद मर्गज, संजय वाळके, राजा राणे, सुशिल पडते, नंदू म्हापसेकर, नंदिनी देसाई आदी उपस्थित होते.