|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पक्षनेतृत्वाला कारवाईचा आनंद घेऊ द्या : सदाभाऊ खोत

पक्षनेतृत्वाला कारवाईचा आनंद घेऊ द्या : सदाभाऊ खोत 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टीचा निर्णय झाल्याचे ऐकून मनाला दुःख झाले. राज्याच्या सरकारमध्ये मंत्री असल्याचा दोष आहे का? असा सवाल करतानाच मी कुठेही असलो, तरी आयुष्यभर शेतकऱयांबरोबरच राहीन. माझ्यावर कारवाई करुन पक्ष नेतृत्वास आनंद होत असेल, तर त्यांना आनंद घेऊ देत,  अशी मार्मिक प्रतिक्रिया कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

  ते पुढे म्हणाले, आंदोलनात मी लाठय़ा खाऊन अनेक वर्षे शेतकरी चळवळीत काम केले आहे. त्यामुळे शेतकरी चळवळीशी पूर्ण एकरुप आहे. सरकारमध्ये मंत्री असल्याच्या व्यक्तिव्देषातूनच हे पाऊल उचलले गेले आहे. मंत्रीपदानंतर चार पाच महिने आजारपणात गेली. मात्र शेतकऱयांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठेही कमी पडलेलो नाही. सरकारच्या माध्यातून शेतकऱयांसाठीचे अनेक चांगले निर्णय घेण्याचे काम मी केले आहे. खा. राजू शेट्टी यांनी अनेक निवडणुकात वेगवेगळ्या पक्षांबरोबर आघाडय़ा केल्या आहेत. ते स्वयंभू नेते आहेत. कोणत्यावेळी काय निर्णय घ्यावेत, हे तेच ठरवत असतात. दरम्यान, सागर सदाभाऊ खोत म्हणाले, कारवाई झाली तरी सदाभाऊ खोत यांच्या छातीवर अजूनही बिल्ला कायम आहे. खा. शेट्टी हे नेहमीच सोयीचे राजकारण करतात. त्यांनी एकटय़ांनी घेतलेल्या निर्णयामागे सर्वांनी जावे, अशी स्थिती कायमची आहे. या कारवाई नंतर  खोत यांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थकांनी बैठक घेऊन सदाभाऊ खोत हे लढवय्ये व खंबीर नेते आहेत. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले आहेत, अशा शब्दात गौरव करुन कारवाईचा निषेध केला. मात्र खोत यांनी अद्याप पुढील वाटचाल गुलदस्त्यात ठेवली आहे.

Related posts: