|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » 331 कंपन्यांचे ट्रेडिंग बंद

331 कंपन्यांचे ट्रेडिंग बंद 

शेल कंपन्या असल्याचा संशय : सेबीची कारवाई

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सेबीच्या निर्देशानुसार 331 संशयास्पद शेल कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारपासून या कंपन्याचे भांडवली बाजारातील ट्रेडिंग बंद करण्यत आले आहे. लवकर या कंपन्यांना सूचीबाहय़ करण्याची शक्यता आहे. या कंपन्या आर्थिक गैरव्यवहारासाठी स्थापन करण्यात आल्याचा संशय असून उद्योग व्यवहार मंत्रालयाने त्यांची यादी यापूर्वी तयार केली होती.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, राष्ट्रीय शेअर बाजार आणि मेट्रोपोलिटन स्टॉक एक्स्चेंज यांना ही यादी पाठवित या कंपन्यांचे मानांकन घटवित स्टेज 4 मध्ये ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. बीएसईने यानुसार कारवाई केल्याचे सांगितले. या कंपन्यांच्या समभागात नियमितपणे व्यवहार होत नसल्याने कारवाई करण्यात आली. आता हे समभाग खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध असणार नाहीत. महिन्यातून् एकदाच व्यवहार होणाऱया समभागांना स्टेज-4 मध्ये ठेवण्यात येते. याचप्रमाणे या समभागात गेल्या टेडिंग किमतीच्या तुलनेत या समभागांची किंमत वर जाण्यास परवानगी असणार नाही. मात्र असे झाल्यास खरेदीदाराला त्या मुल्याच्या तुलनेत 200 पट अतिरिक्त सर्व्हिलांस डिपॉझिट जमा करावे लागले. ही रक्कम एक्स्चेंजकडे 5 महिन्यापर्यंत राहील.

या बनावट कंपन्यांपैकी अनेक कंपन्या या पश्चिम बंगाल राज्यातील आहेत. या सर्व कंपन्यांची हिशोबतपासणी स्वतंत्रपणे करण्यास सांगण्यात आले आहे. गरज भासल्यास या कंपन्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येईल. यानंतरही या कंपन्यांमध्ये बनावटगिरी असल्याचे उघडकीस आल्यास सक्तीने सूचीबाहय़ करण्यात येईल. या कंपन्यांना एक्स्चेंजवर कोणत्याही व्यवहाराला मंजुरी देण्यात येणार नाही आणि सूचीबाहय़तेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत डिपॉझिटरी रक्कम गोठविण्यात येईल.

1.62 लाख कंपन्यांची नोंदणी रद्द…

1,62,618 कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. मुंबईतील 33 हजार, दिल्लीतील 22,863 आणि हैदराबादमधील 20,558 कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आल्याचे अर्थराज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी राज्यसभेत सांगितले.