|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दीपक मिश्रा होणार आगामी सरन्यायाधीश

दीपक मिश्रा होणार आगामी सरन्यायाधीश 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारताच्या आगामी सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. कायदा व न्याय मंत्रालयाकडून मंगळवारी यासंबंधीची अधिकृत घोषणा करण्यात आली. विद्यमान सरन्यायाधीश जे. एस. खेहर हे चालू महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. खेहर यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती मिश्रा यांच्याकडे पदभार सोपविला जाणार आहे.

63 वर्षीय दीपक मिश्रा यांची ‘प्रो सिटीझन जज’ अशी जनमानसात ओळख आहे. दिल्लीतील बहुचर्चित निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणासह अनेक मोठय़ा खटल्यांचा तटस्थ निकाल देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावलेली आहे. दहशतवादी याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेसंबंधीच्या निर्णयासाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीतील खंडपीठामध्येही त्यांचा सहभाग होता.