|Sunday, September 22, 2019
You are here: Home » उद्योग » ट्रेडिंगसाठी आधार सक्तीचे करण्याचा विचार

ट्रेडिंगसाठी आधार सक्तीचे करण्याचा विचार 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

भांडवली बाजारात होणाऱया आर्थिक उलाढालीवर नजर ठेवण्यासाठी आधार कार्डचा वापर बंधनकारक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे समभाग आणि म्युच्युअल फंडची खरेदी-विक्री करताना आधार सक्तीचे करण्यात येईल. भांडवली बाजारात गुंतवणूक करत काळा पैसा हा पांढरा करण्यात येत असल्याचे समजले जाते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सेबी आणि केंद्र सरकार अशा व्यवहारांसाठी आधार बंधनकारक करण्याचा विचार करत आहे.

करचोरी रोखण्यासाठी केवळ पॅनचा वापर करणे पुरेसे नाही, असे सरकारच्या लक्षात आले आहे. यामुळे भांडवली बाजारातील व्यवहारांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आधार क्रमांकचा वापर करण्यासाठी सेबी प्रयत्नशील आहे. अशा व्यवहारांसाठी आधार बंधनकारक केल्यास काय परिणाम होईल, याची चाचपणी करण्यात येत आहे. या व्यवहारांसाठी आधार बंधनकारक करण्याच्या कालावधीबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. याचप्रमाणे पॅनचा वापर करण्याऐवजी केवळ आधार सक्तीचे करण्यात येईल याबाबत स्पष्ट संकेत देण्यात आलेले नाहीत.

आता भांडवली बाजारातील सर्व व्यवहार हे डीमॅट खात्याने होत असल्याने ते ऑनलाईन होतात. ई-केवायसीसाठी केवळ आधार क्रमांक देण्याची गरज भासेल. यासाठी गुंतवणूकदारांना आपल्या ब्रोकरकडे जाण्याची गरज भासणार नाही. भांडवली बाजारात आधार बंधनकारक करण्यात आल्यास देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी मोठे पाऊल असल्याचे सांगितले जाते. अनेक गुंतवणूकदारांकडे बनावट पॅन असल्याने त्याचा गैरफायदा घेण्यासाठी वापर केला जातो.