|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘नियोजन’ मतदानाला 17 सदस्यांची दांडी

‘नियोजन’ मतदानाला 17 सदस्यांची दांडी 

14 ज़ि प़ तर 3 न. प. सदस्य गैरहजर

5 जागांसाठी निवडणूक, आज निकाल

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या 5 जागांसाठी गुरूवारी झालेल्या निवडणुकीत 17 सदस्यांनी दांडी मारली. यात जिल्हा परिषदेच्या व नगर परिषदेच्या 3 नगरसेवकांचा समावेश आहे. या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवार नेत्रा ठाकूर करिष्मा दाखवणार का याकडे जिल्हय़ाचे लक्ष लागले आहे.

जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या 24 पैकी 19 सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहे. त्यामुळे उर्वरीत 5 जागांसाठी मतदान प्रक्रिया गुरूवारी राबवण्यात आल़ी या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब बेलदार यांनी काम पाहिले. नियोजन मंडळाच्या 21 जागा ग्रामीण क्षेत्र मतदार संघासाठी राखीव आहेत. या जागांवर जिल्हा परिषदेचे सदस्य उमेदवार निवडून देतात. मागास प्रवर्गासाठी राष्ट्रवादीच्या जि. प. सदस्या नेत्रा ठाकूर यांनी दाखल केलेला अर्ज मागे घ्यावा, असे आदेश पक्षाने दिले होते. शिवसेना, राष्ट्रवादी नेत्यांच्या समझोत्यानुसार ही जागा शिवसेनेच्या वाटय़ाला आली होती. तथापि ठाकूर यांनी आपला अर्ज कायम ठेवला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून ठाकूर आपला करीष्मा दाखवणार का, याचे उत्तर शुक्रवारी मतमोजणीनंतर मिळणार आहे. या मतदारसंघातील दोन जागांसाठी ठाकूर, अनंत करंबळे, आरती तोडणकर यांच्यात लढत होणार आहे.

लहान नागरिक क्षेत्र मतदार संघासाठी नगर परिषदेच्या 1 जागेसाठी 4 उमेदवारांनी अर्ज भरले. सुशांत चवंडे (भाजप), मिरा पिलणकर (शिवसेना), यांच्यात लढत होत़ी सर्वसाधारणच्या जागेसाठी स्नेहा कुवेसकर, शशिकांत मोदी यांच्यात लढत झाल़ी संक्रमण मतदार संघाच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीचे खालिद रखांगे, रवींद्र कांबळे (भाजप), नंदादीप बोरुकर (शिवसेना) यांच्यातील लढतीचा निकाल शुक्रवारी सकाळी 8 व़ा पासून होणाऱया मतमोजणीत समजणार आह़े

या निवडणुकीत तब्बल 17 सदस्यांनी दांडी मारल्याने निकालाकडे लक्ष लागले आहे. नगर पंचायतीच्या सर्वच्या सर्व म्हणजे 85 सदस्यांनी मतदान केल़े नगर परिषदेच्या 94 पैकी 91 सदस्यांनी मतदान केले. तर जिल्हा परिषदेच्या 55 पैकी 41 जणांचे मतदान नोंदवले गेल़े