|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ऍग्री बिझनेस अभ्यासक्रम कोकणातून हद्दपार!

ऍग्री बिझनेस अभ्यासक्रम कोकणातून हद्दपार! 

सिंधुदुर्गातील किर्लोस महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया स्थगित

दापोली कृषी विद्यापीठाच्या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष

त्रुटी पुर्ण करण्यासाठी मागितलेल्या मुदतवाढीस विद्यापीठाकडून नकार

राजगोपाल मयेकर /दापोली

सिंधुदुर्ग जिह्यातील किर्लोस येथील ऍग्री बिजनेस अर्थात कृषी व्यवसाय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया शुक्रवारी अचानक बंद करण्याचा निर्णय डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे कोकणातून हा अभ्यासक्रमच हद्दपार झाला आहे. कृषी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रक्रिया स्धगितीचे आदेश आल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

गेल्या महिन्यात राज्यपालांनी महाराष्ट्र शिक्षण व संशोधन परिषद (एमसीएआर) आणि कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना नियमितपणे ‘ड’ वर्गात नोंदणी करणाऱया कृषी महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्याची सूचना केली होती. त्याचीच ही फलश्रुती ठरली आहे.

मुळात कृषी क्षेत्राला अधिकाधिक चालना मिळण्यासाठी कृषी व्यवसाय वाढायला हवेत, असे धोरण शासनाकडून राबवले जाते. त्याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिह्यातील कृषीक्षेत्रात काम करणारे हेवीवेट नेते माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानच्या माध्यमातून किर्लोस येथे कोकणातील पहिले कृषी व्यवसाय महाविद्यालय सुरू केले. 2006मध्ये सुरू झालेल्या महाविद्यालयाला गेल्या काही वर्षांपासून ‘ड’ दर्जा मिळत होता. याबाबत नेमलेल्या पुरी समितीने जूनमध्ये अशा ‘ड’ दर्जाच्या महाविद्यालयांची नोंद करून त्यांचा दर्जा वाढवण्याची शिफारस केली होती. याप्रकरणी राज्यातील सर्वच कृषी विद्यापीठांत शिथिल धोरण राबवण्याची मानसिकता होती. मात्र गेल्या महिन्यात राज्यपालांनी कडक कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर एमसीएआरच्या वेगाने हालचाली झाल्या. त्यानुसार संबंधित महाविद्यालयांना विद्यापीठाकडे खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले.

किर्लोसच्या ऍग्री बिजनेस महाविद्यालय़ाने काल खुलाशाचे पत्र कोकण कृषी विद्यापीठाकडे सादर केले. संस्थेकडील अपुरी जमीन, कमी कर्मचारी संख्या, आवश्यक वर्गखोल्या आणि वसतिगृहाची कमतरता याबाबतच्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयाने सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली होती, पण त्यांची मागणी फेटाळून लावत विद्यापीठाने शुक्रवारी त्यांच्या महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया रोखण्याचा निर्णय घेतला. तसे पत्रही त्यांनी एमसीएआरला दिले आहे.

रसायनी-पनवेल येथील हाच शिक्षणक्रम शिकवणारे दुसरे महाविद्यालय गेल्या वर्षीपासून बंद झाले आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रमच कोकणातून हद्दपार झाल्याचे आता स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे कृषी अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश यादी गुरूवारी प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आल्याने या अभ्यासक्रमाचा प्राधान्यक्रम निवडणाऱया विद्यार्थ्यांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या या निर्णयामुळे कोकणातील एकमेव अँग्री बिजनेस महाविद्यालयाला यंदा टाळे लागणार असले तरी सध्या दुसऱया, तिसऱया व चौथ्या वर्षासाठी प्रवेश घेतलेलया विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही बदल होणार नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

याबाबत माहिती देताना कोकण कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक सतीश नारखेडे यांनी सांगितले की, ड श्रेणी महाविद्यालयांवरील कार्यवाहीची ही प्रक्रिया चार महिन्यांपूर्वीपासून सुरू आहे. बुधवारी महाविद्यालयाकडून असमाधानकारक खुलासा मिळाल्याने संस्थेवर प्रवेश स्थगितीची कारवाई करावी लागली. मात्र या महाविद्यालयाला प्राधान्यक्रम देणाऱया विद्यार्थ्यांना आता इतर महाविद्यालयांच्या दुसऱया प्रवेश यादीत सामावून घेण्यात येईल.

Related posts: