|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा कार्बन फॅक्टरीतून होणारे प्रदूषण रोखा

गोवा कार्बन फॅक्टरीतून होणारे प्रदूषण रोखा 

प्रतिनिधी/ मडगाव

सांव जुझे दी आरियल येथील गोवा कार्बन फॅक्टरीतून गेली 40 वर्षे प्रदूषण होत असून या प्रकरणी अनेक वेळा आवाज उठविला तरी सरकार स्थानिक लोकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप काल सामाजिक न्याय मंचने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. या फॅक्टरीतून होणारे प्रदूषण सरकारने त्वरित रोखावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

गोवा कार्बन फॅक्टरीतून होणाऱया प्रदूषणामुळे स्थानिक लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम झालेला आहे. या फॅक्टरीच्या परिसरात राहणाऱया लोकांना दिवस-रात्र या प्रदूषणाचा सामना करावा लागतो. लहान मुलांपासून ज्येष्ठांना देखील कार्बन प्रदूषणामुळे आजारांचा सामना करावा लागतो. या परीसरातील शैक्षणिक संस्था  तसेच शेती-बागायतीवर देखील परिणाम झालेला आहे. पर्यावरणावर देखील विपरित परिणाम झाला असून शेती-बागायतीच्या उत्पन्नात घट झाल्याची माहिती काल पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या प्रकरणी स्थानिक लोकांनी अनेक वेळा आवाज उठविला. ग्रामसभेत अनेक वेळा ठराव घेतले, स्थानिक आमदाराच्या माध्यमातून विषय विधानसभेत नेला. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु, अद्याप ठोस कशी कृती होत नसल्याने काल सामाजिक न्याय मंचच्या पदाधिकाऱयांनी तीव्र ना पसंती व्यक्त केली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने या पूर्वी सांव जुझे दी आरियल भागात येऊन पाहणी केली होती व आपला अहवाल दिला होता. त्यात कार्बनमुळे प्रदूषण होत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. तसेच हे प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना सूचविल्या होत्या. पण, या उपाय योजना प्रत्यक्षात अमलात आणल्या गेल्या नसल्याचा दावा देखील यावेळी करण्यात आला.

सद्या कंपनीने आपल्या उत्पादनात वाढ केल्याने साहजिकच प्रदूषणात देखील वाढ झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला. सरकारने हे प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा या भागात रोगराई थैमान घालणार असल्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. जर सरकारने योग्य ती उपाय योजना आखली नाही तर लोकांना रस्त्यावर उतरण्यावाचून पर्याय शिल्लक रहाणार नसल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

पत्रकार परिषदेला सामाजिक न्याय मंचचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.