|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » मनोरंजन » जिंदगी नॉट आउटमध्ये फ्रेश जोडी

जिंदगी नॉट आउटमध्ये फ्रेश जोडी 

प्रेमाची भाषा वेगळीच असते. ती सांगायला शब्द लागत नाहीत. प्रेम करणाऱयांना एकमेकांच्या नजरेतून प्रेम जाणवते. एकमेकांवरचा विश्वास, एकमेकांसाठी काहीही करण्याची इच्छा त्या दोघांमधील प्रेम आणखी घट्ट करते. हे नातं जिंदगी नॉट आउटच्या सचिन आणि स्नेहाच्या फ्रेश जोडीत प्रेक्षकांना नक्कीच जाणवेल. आपल्या जोडीदाराचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जेव्हा आयुष्याचा जोडीदार साथ देतो तेव्हा त्या स्वप्नपूर्तीलाही वेगळेच तेज येते. आणि केवळ जोडीदारच नाही तर संपूर्ण कुटुंब एकत्र होऊन घरातील व्यक्तीला त्याचं स्वप्न आपलं स्वप्न म्हणून जगायला सुरू करत तेव्हा ते स्वप्न पूर्ण व्हायला जास्त वेळ लागत नाही. याच भावविश्वावर आधारित जिंदगी नॉट आउट ही मालिका झी युवा या वाहिनीवर नुकतीच सुरू झाली आहे.

मायेची ऊब देणारी आई… आधाराचा हात पाठीवर ठेवणारे वडील… लुटूपुटूच्या भांडणातही आनंद शोधणाऱया बहिणी… कुटुंबात जेव्हा अशा नात्याचे बंध एकमेकांसोबत दृढपणे बांधलेले असतात तेव्हा डोळय़ात सामावलेली आकाशाएवढी स्वप्नं पूर्ण करण्याची हिम्मत मिळत असते. आयुष्यातील प्रत्येक संकट परतवून लावण्याची धमक येते. कुटुंबाची सर्वात मोठी ताकद असते ते एकमेकांमधील भावनिक बंध. यशाचे शिखर असो किंवा अपयशाची ठेच… संघर्षाचे चटके असोत किंवा स्वप्नपूर्तीचा प्रवास… यामध्ये कुटुंबाची साथ असेल तर कोणतीही खडतर गोष्ट सोपी होते हे दाखवणारी मालिका म्हणजे जिंदगी नॉट आउट. 21 वर्षाच्या सचिन देसाई या मुलाचं क्रिकेट या खेळावरील प्रेम आणि ते पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेलं त्याचं कुटुंब आपल्याला पाहायला मिळेल. सचिनच्या या स्वप्नात येणाऱया अडचणी आणि त्याला संपूर्ण कुटुंब कसे तोंड देते हे पाहताना नकळतपणे आपल्याला आपल्या कुटुंबाची नव्याने ओळख होईल. आणि भावी आयुष्यातील जोडीदार त्याला आयुष्याच्या सर्वच वळणांवर कशाप्रकारे सांभाळले पाहिजे हे या मालिकेत अतिशय उत्तमरीत्या दाखवले आहे. या मालिकेमध्ये शैलेश दातार, वंदना वाकनीस, तेजस बर्वे, ज्ञानदा रामतीर्थकर, नेहा अष्टपुत्रे, सायली झुरळे, तेजश्री वालावलकर, स्वप्नील फडके, उज्ज्वला जोग, प्रसन्ना केतकर, सिद्धीरूपा करमरकर, अथर्व नकती, राहुल मेहेंदळे, आदिश वैद्य असे अनेक कलाकार आहेत. जिंदगी नॉट आउट या मालिकेची निर्मिती महेश तागडे, जितेंद्र गुप्ता यांच्या टेल अ टेल मीडिया या निर्मिती संस्थेने केली आहे. जितेंद्र गुप्ता, किरण कुलकर्णी, पल्लवी करकेरा यांच्या लेखणीतून ही मालिका आकाराला आली आहे.

Related posts: