|Monday, August 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पंधरा ऑगस्ट

पंधरा ऑगस्ट 

समजून उमजून साजरा केलेला हा कितवा स्वातंत्र्यदिन हे नेमके लक्षात नाही. लहानपणी 15 ऑगस्ट म्हणजे सुट्टी, सकाळी शाळेत जाऊन राष्ट्रगीत म्हणणे, छातीवर छोटा राष्ट्रध्वज अभिमानाने लावणे एवढेच ज्ञात होते. स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व मोठेपणी समजले.

15 ऑगस्टचा दिवस म्हणजे देशभक्तीने भारलेले वातावरण, ध्वजारोहण आणि देशभक्तीपर गाणी… ‘नन्हा मुन्ना राही हूं, देश का सिपाही हूं’, ‘सुन ले बापू यह पैगाम’, ‘दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल’, ‘इन्साफ की डगर पे बच्चो दिखाओ चलके’… अशी कितीतरी गाणी… पुढे नव्या गाण्यांनी त्यांची जागा घेतली. पण तरी सर्व गाण्यांमध्ये आपले राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ आणि राष्ट्रगीत ‘जन गण मन’ यांचेच स्थान अबाधित आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात असंख्य क्रांतिकारकांना बंकिमचंद्र यांच्या ‘वंदे मातरम’ने स्वातंत्र्यलढय़ाची प्रेरणा दिली. ग. दि. माडगूळकरांनी या गीताच्या गौरवार्थ ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम’ हे गीत लिहिले.

27 डिसेंबर 1911 या दिवशी काँग्रेसच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी ‘वंदे मातरम’ आणि दुसऱया दिवशी ‘जन गण मन’ गायले गेले. त्यानंतर प्रास्ताविक झाले आणि मग पंचम जॉर्जबद्दल कुठलेतरी गीत गायिले गेले. मात्र वर्तमानपत्रात आलेल्या मोघम वार्तापत्रांमुळे अनेकांचा गैरसमज झाला की ‘जन गण मन’ हे राजपुत्राच्या स्वागतार्थ रचले होते. ते खरे नाही. सुभाषचंद्र बोस, चित्तरंजन दास आणि अनेक बंगाली क्रांतिकारक सभेची सुरुवात ‘जन गण मन’नेच करीत.

रवींद्रनाथ टागोरांबद्दल तुम्हाला आम्हाला गीतांजली, नोबेल पुरस्कार आणि शांतिनिकेतन यापलीकडे माहिती नसते. रवींद्रनाथ कवी, संगीतकार, कथाकार, नाटककार, चित्रकार, वैद्य, होमिओपॅथ, उत्तम ज्युदोपटू होते. त्यांनी लहान मुलांसाठी पाठय़पुस्तके रचली. नोबेलची रक्कम आणि आयुष्यभराची पुंजी  शांतिनिकेतनसाठी दिली. संत तुकारामांचे अभंग बंगालीत अनुवादित केले. शिवाजी महाराजांवर खंडकाव्य लिहिले. जालियाँवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून ‘सर’ ही पदवी परत केली. गांधीजी आणि आंबेडकर यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या तीन देशांची राष्ट्रगीते टागोरांनी लिहिलेली आहेत. हा एक विश्वविक्रमच आहे.

उत्तरायुष्यात रवीन्दनाथांनी इंग्रजांवर कडाडून टीका करणारे एक अनावृत पत्र प्रकाशित केले. त्याबद्दल ब्रिटिशांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्याचे योजले होते. पण खटला उभा राहण्याआधीच रवींद्रनाथांचे निधन झाले.