|Monday, January 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » देवस्थान समितीच्या कारभारात सुसूत्रता, पारदर्शक्ता आणू

देवस्थान समितीच्या कारभारात सुसूत्रता, पारदर्शक्ता आणू 

– पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांचे प्रतिपाद

प्रतिनिधी/ कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी महेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. देवस्थान समितीचा कारभार, अंबाबाई मंदिरातील सुविधा, आणि तीर्थक्षेत्र विकास आराखडा याबद्दल महेश जाधव यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न – देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर काय वाटते?

महेश जाधव – भारतीय जनता पक्षाचे काम मी प्रामाणिकपणे केले. पक्षाने जी जबाबदारी दिली ती उत्तम प्रकारे पार पाडली. यामुळेच मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी मोठय़ा विश्वासाने अध्यक्षपदाचे दायित्व दिल्याने आनंद झाला. आमचे जाधव घराणे पूर्वीपासूनच अंबाबाईच्या सेवेमध्ये आहे. मंदिरातील तोफ उडवण्याचा मान आमचा आहे. अध्यक्षपदाच्या माध्यमातून देवीची आणखी सेवा करता येईल याचे समाधान वाटते.

 

प्रश्न – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा अध्यक्ष म्हणून नियोजन काय असेल?

महेश जाधव – तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला गेला तर अनेक गोष्टी कमी कालावधीमध्ये साध्य करता येतात. देवस्थान समितीचे संकेतस्थळ आहे ते अधिक अद्ययावत कसे करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या संकेतस्थळावर देवस्थान समितीच्या अंतर्गत येणाऱया प्रत्येक देवस्थानाची माहिती, छायाचित्र, त्या देवस्थानच्या जमिनी आणि त्या कसणारे खंडकरी या सर्वाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून दिली जाईल. तसेच देवस्थान समितीचे उपक्रम, ठराव हेदेखील या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. भाविक आणि देवस्थान समिती यांना जोडणारा दुवा म्हणून हे संकेतस्थळ काम करेल.

 

प्रश्न – अंबाबाई मंदिरातील वाद आणि सुरक्षा या विषयी काही योजले आहे का?

महेश जाधव – अंबाबाई मंदिर, देवीचे स्वरुप याबद्दल सातत्याने वाद उत्पन्न होणे योग्य नाही. या बद्दलची कायदेशीर आणि धार्मिक माहिती, मंदिराबाबतच्या प्रथा-परंपरा याबद्दलची सत्य माहिती राज्याच्या विधी व न्याय विभागाला दिली जाईल. त्यानंतर संवादाच्या माध्यमातून मंदिरातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करू. मंदिराचे संवर्धन हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. यासाठी पुरातत्व विभागाशी संपर्क करुन योग्य त्या उपाय योजना करू. मंदिराच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. मंदिरात येणाऱया प्रत्येक भाविकांचा चेहरा दर्शवणारे सीसीटीव्ही पॅमेरे, अद्ययावत सुरक्षा यंत्रणा याही मंदिरात बसवण्यात येतील.

प्रश्न – देवस्थान समितीचा कारभार नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. याबद्दल काय उपाययोजना करणार.

महेश जाधव – देवस्थान समितीच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाची चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणांना सर्वतोपरी मदत केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. इथून पुढे देवस्थान समितीच्या कारभारात सुसुत्रता आणि पारदर्शकता यावी यासाठी नवी संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) विकसित करणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव उरणार नाही. तीर्थक्षेत्रामध्ये जमा होणारी रक्कम ही लोकोपयोगी योजनांसाठी वापरली जाणे आवश्यक आहे. यासाठी देवस्थानांचा कारभार समाजाभिमूख होणे गरजेचे आहे. देवीचा प्रसाद, अन्नछत्र असे नित्य उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. यासाठी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम केले जाईल.

Related posts: