|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » खड्डे बुजविण्यासाठी पथक तैनात करणार!

खड्डे बुजविण्यासाठी पथक तैनात करणार! 

सिंधुदुर्गनगरी : महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम दोन दिवसात पूर्ण होईल. मात्र, पाऊस केव्हा पडेल हे सांगता येत नसल्यामुळे गणेशोत्सव काळात अतिवृष्टी झाल्यास पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख मार्गांवर 50 कि. मी. अंतरावर बांधकाम विभागाने पथक तैनात करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पाटील यांनी रविवारी जिल्हय़ाचा दौरा केला. या दौऱयात पाटील यांनी आंबोली नांगरतासवाडी, आंबोली घाट, झाराप तिठा, कुडाळ, पावशी, ओरोस, कणकवली तळेरे, वैभववाडी, गगनबावडा घाट रस्त्याची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव एक. के. सिंग, रस्ते विभागाचे सचिव सी. पी. जोशी, बांधकाम विभागाचे सचिव सगणे, मुख्य अभियंता केडगे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, आमदार वैभव नाईक, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, सरचिटणीस राजन तेली, संदेश पारकर, काका कुडाळकर, प्रभाकर सावंत, अतुल काळसेकर, संजय पडते, अभय शिरसाट आदी उपस्थित होते.

कोकणात गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होतो. हजारोंच्या संख्येने चाकरमानी गावी येतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्ते सुस्थितीत व खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाटील म्हणाले. अधूनमधून होणारा पाऊस, संबंधित ठेकेदाराकडून झालेला विलंबामुळे महामार्गावरील खड्डे भरण्यास थोडा उशीर झाला. मात्र, आतापर्यंत 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम दोन दिवसात पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. गणेशोत्सव काळात प्रत्येक 50 कि. मी. अंतरावर पथक कार्यरत ठेऊन तात्काळ खड्डे बुजवले जातील, असे पाटील यांनी सांगितले.

पाटील यांनी ओरोस येथे शासकीय विश्रामगृह तसेच ठिकठिकाणी जनतेकडून निवेदने स्वीकारली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बच्चे पाटील, रत्नागिरी परिमंडळाचे अधीक्षक अभियंता एस. एन. राजभोज उपस्थित होते.