|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » गुलजारांचा लिबास 29 वर्षांनी रुपेरी पडद्यावर

गुलजारांचा लिबास 29 वर्षांनी रुपेरी पडद्यावर 

1988 साली तयार झालेला चित्रपट यंदा प्रदर्शनाच्या वाटय़ावर

मुंबई / प्रतिनिधी

सिद्धहस्त कवी, लेखक आणि दिग्दर्शक गुलजार यांचे चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये माईलस्टोन ठरले. एक आकार, हुतूतू, माचिस, सुनिये, अंगूर, नमकीन, आँधी, खुशबू, मौसम अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून गुलजार यांची खास ओळख आहे. कवी आणि लेखक म्हणून सध्या गुलजार यांनी सगळ्यांच्याच मनावर अधिराज्य गाजविले असले तरी दिग्दर्शक म्हणूनही ते नावाजलेले आहेत. आता गुलजार यांच्या चाहत्यांसाठी खुषखबर आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला लिबास हा चित्रपट तब्बल 29 वर्षांनी प्रदर्शित होणार आहे. 1988 साली हा चित्रपट तयार झाला होता.

झी क्लासिकच्यावतीने ‘वो जमाना करे दिवाना’ या उपक्रमांतर्गत लिबास चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये नसीरुद्दीन शहा, शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गुलजार यांच्या रवी पार कलेक्शनमधील ‘सीमा’ या लघुकथेवर हा चित्रपट बेतलेला आहे. या चित्रपटामध्ये नसीरुद्दीन शहा यांनी सुधीर या नाटककाराची तर शबाना आजमी यांनी सीमा ही त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये राज बब्बर, सविता बजाज, अन्नू कपूर, उत्पल दत्त आणि सुषमा सेठ यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाला दिवंगत संगीत दिग्दर्शक आर. डी बर्मन यांचे संगीत लाभले आहे. त्यावेळी विकास मोहन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. मात्र काही कारणास्तव हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. आता विकास यांची मुले अमूल आणि अंशुल यांनी या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरविले आहे. या चित्रपटाविषयी अधिक माहिती देताना अमूल मोहन यांनी सांगितले की, या चित्रपटाचा मी भाग झालो याचा मला आनंद आहे. माझ्या वडिलांचे हे स्वप्न होते. येत्या वर्षाअखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होऊन माझ्या वडिलांचे स्वप्न मी पूर्ण करणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख आम्ही जाहीर करणार आहोत. झी स्टुडिओतर्फे या चित्रपटाचे देशभर वितरण करण्यात येणार आहे.

22 नोव्हेंबर 2014 साली म्हणजेच तब्बल 22 वर्षांनी गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविण्यात आला होता. 1992 साली बंगळूरू येथील महोत्सवात हा चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली होती. 1971 साली मेरे अपने या चित्रपटाच्या माध्यमातून गुलजार यांनी दिग्दर्शक म्हणून आपली नवी कारकीर्द सुरु केली. हुतूतू हा चित्रपट दिग्दर्शित केल्यानंतर लेखनाकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी दिग्दर्शन सोडले. याशिवाय रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याचे भाषांतरही त्यांनी दरम्यानच्या काळात केले.