|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » किदाम्बी श्रीकांतची विजयी सलामी

किदाम्बी श्रीकांतची विजयी सलामी 

प्राजक्ता सावंत, सात्विक-मनीषा यांचीही मिश्र दुहेरीत आगेकूच

वृत्तसंस्था/ ग्लासगो

भारताच्या किदाम्बी श्रीकांत विश्व बॅडमिंटन स्पर्धेत विजयी प्रारंभ केला असून त्याने रशियाच्या बिगरमानांकित खेळाडूवर सहज मात करून दुसऱया फेरीत स्थान मिळविले. त्याचप्रमाणे मिश्र दुहेरीतही भारताच्या दोन जोडय़ांनी विजयी सलामी दिली.

श्रीकांतने सर्जी सिरांतवर 21-13, 21-12 अशी केवळ 28 मिनिटांत मात केली. आठवे मानांकन असलेल्या श्रीकांतची पुढील लढत फ्रान्सच्या लुकास कॉर्व्हीशी होईल. मिश्र दुहेरीत भारताची प्राजक्ता सावंत मलेशियाच्या योगेंद्रन कृष्णनसमवेत खेळत असून या जोडीने चिनी तैपेईच्या काइ हसीन व चिंग यावो यांच्यावर 21-15, 13-21, 21-18 अशी चुरशीच्या लढतीत मात केली. रंगतदार ठरलेली ही लढत 49 मिनिटे चालली होती. भारताच्या सात्विक साईराज व के. मनीषा यांनाही विजयासाठी संघर्ष करावा लागला. या जोडीने हाँगकाँगच्या टॅम हेई व एन्ग यावु यांच्यावर 24-22, 21-17 अशी मात केली. ही लढत 44 मिनिटे रंगली होती.

फॉर्ममध्ये असलेल्या श्रीकांतसाठी रशियाचा सिरांत हा जोड ठरू शकला नाही. श्रीने आक्रमक प्रारंभ करीत पहिल्या गेममध्ये 6-1 अशी झटपट आघाडी घेतली. बेकवेळी ही आघाडी त्याने 11-6 अशी केली होती. नंतर ही आघाडी त्याने आणखी वाढवत नेत 15-7 अशी केल्यावर सिरांतने काही सलग गुण घेत श्रीची आघाडी कमी केली. मात्र श्रीला तो गाठू शकला नाही. दुसऱया गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी प्रारंभी सारखेच गुण मिळवित 2-2 अशी बरोबरी साधली होती. पण श्रीकांतने सलग गुण घेत सिरांत 9-2 असे मागे टाकले. ब्रेकवेळी त्याने ही आघाडी 11-5 अशी केली होती. श्रीकांतने सहा गुणांची आघाडी कायम राखत 15-9 अशी बढत घेतली आणि शेवटी हा गेम त्याने 21-12 असा घेत सामना संपविला.