|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सजवटीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली

सजवटीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली 

वेंगुर्ले : कोकणवासीयांसाठी जिव्हाळय़ाचा मानला जाणारा गणेशचतुर्थी उत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेश चित्रशाळा गजबजू लागल्या आहेत. गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. तबला, ढोलकी कारागिरीही आपल्या कामात मग्न आहेत. गणेशोत्सवानिमित्तची आरास आणि सजावट करण्यासाठी लागणाऱया साहित्यांनी मार्केट नववधूप्रमाणे सजले आहे. मात्र, खरेदीवर मंदीचे सावट दिसून येत आहे.

गणेशोत्सव हा कोकणात मोठय़ा उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा करण्यात येणारा सण! या सणामधील पारंपरिकता नेहमीच जोपासली जाते. गणेशोत्सव म्हटला की, अगोदर दहा-पंधरा दिवसांपासून तयारीला सुरुवात होते. पूर्वी घराच्या रंगरंगोटीसाठी व गणपतीच्या पाठीमागील भिंत रंगविण्यासाठी बारा बलुतेदारापैकी गावकर मंडळी रेवा व शेड आणून देत. घराला रेवा काढून घराची रंगरंगोटी केली जायची. घराची रंगरंगोटी झाल्यानंतर गणेश विसर्जनापर्यंत घरात मटण, मच्छी केली जात नसे. आज रेवा व शेड मागे पडून डिसटेंपर कलरची क्रेझ आली आहे. पूर्वी गणपतीच्या पाठीमागील भिंती ‘कमळ’ रंगविण्याची प्रथा होती. गावातीलच कलाकार आज एकाकडे तर दुसऱया दिवशीत दुसरीकडे असे दिवस ठरवून रात्रं जागून कमळ काढायचे. त्यातच त्या घरमालकाकडून सूर्यकमळ हवे, कमळाभोवती ‘कुवली’ हवीच, अशी आग्रही मागणी असायची. आता यात बदल होत गेले. कमळाची जागा वेगवेगळे सीन्स आणि देवतांच्या चित्रांनी घेतली. आता तर गणपतीच्या पाठीमागे लावण्यासाठी वेगवेगळे फ्लेक्स बाजारात आले आहेत.

गणेशोत्सवाच्या आगमनाच्या तयारीसाठी आबालवृद्ध जोरदारपणे तयारीला लागतात. गणेशोत्सवाची आरास व इतर सुशोभिकरणासाठी नैसर्गिक पातळीवर उपलब्ध होणाऱया साधनसामुग्रीचा वापर करुन त्यानुसार सजावट करण्यात येत असे. यासाठी विविध रानझाडे, पाने, फळे, यांचा वापर होत असे. माटवी सजावटीसाठीही शेरवड, हरणं, कवंडळ, काकडी, नारळ, सुपारी, रानफळे, पाने, फळे याचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जायचा. आज या साहित्याबरोबरच मार्केटमध्ये विविध प्रकारचे साहित्य गणपती व गौरीच्या सजावटीसाठी उपलब्ध झाले आहे. अगदी थर्माकोलपासून इलेक्ट्रीट वस्तू उपलब्ध आहेत. श्रीगणेशाला विराजमान करण्यासाठी मखरापासून ते माटवी सजावटीसाठी लाकडी, प्लॅस्टिकची पाने, फुले, फळे अशा अनेक गोष्टी  बाजारात उपलब्ध आहेत. आरास करण्यासाठी विविध माळा, हार, शोभेच्या वस्तू बाजारपेठेत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. नैसर्गिकतेतून आधुनिकतेकडे वळताना घराघरात अशा गोष्टीचा वापर होताना दिसतो.

कापड दुकानेही सजली

गेल्या आठ दिवसात बाजारात विविध वस्तूही दाखल झाल्या आहेत. अनेक दुकाने या वस्तूंनी सजलेली आहेत. गणेशोत्सवानिमित्त लहान मुलासह घरातील अनेकांना कपडे खरेदी करण्याची प्रथा आजही जोपासली जाते. पूर्वी अशा सणासुदीलाच नवीन कपडय़ांची खरेदी होत असे. आता काळ बदलला असला तरीही सणानिमित्त होणारी खरेदी होत असल्याने कपडय़ांची दुकानेही नवीन कपडय़ांनी सजली आहेत. गणपतीच्या पाठीमागे लावण्यासाठी विविध देवतांच्या फोटोचे फ्लेक्सही 200 रुपये ते 2000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

बाजारपेठेवर मंदीचे सावट

गणेशोत्सवात गणपतीची मूर्ती ही शाडू मातीचीच असावी, असे शास्त्र आहे. अलिकडे सगळीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची क्रेझ आहे. मात्र, वेंगुर्ले तालुका त्याला अपवाद आहे. वेंगुर्ल्यात एक-दोन चित्रशाळा सोडल्यास सर्वच शाळांमध्ये शाडू मातीच्याच मूर्ती दिसून येतात. येथील मूर्तीकार वर्षानुवर्षे परंपरागत चालत आलेल्या कलेचा वारसा जतन करताना दिसत आहेत. यावर्षी जीएसटीमुळे गणेशमूर्तीच्या किंमती वाढल्या आहेत. पण येथील गणेशभक्त गणपतीची किंमत करीत नाही. त्यांना पैसे सांगावे लागत नाहीत ते आपणहून दरवर्षीपेक्षा जास्त पैसे समजून देतात, असे येथील प्रसिद्ध गणेश मूर्तीकार चतुर नार्वेकर यांनी सांगितले.