|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाकिस्तान दहशतवाद्यांचा ‘स्वर्ग’ : ट्रम्प

पाकिस्तान दहशतवाद्यांचा ‘स्वर्ग’ : ट्रम्प 

अफगाणविषयक धोरण जाहीर : पाकिस्तानला कारवाईचा इशारा, भारताचे तोंडभरून कौतुक

वॉशिंग्टन/ वृत्तसंस्था

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अफगाणिस्तानविषयक नवे धोरण जाहीर केले. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानात भारताने अमेरिकेची मदत करावी असे वक्तव्य केले. भारतासोबत एक दृढ धोरणात्मक भागिदारी विकसित करू असे सांगत ट्रम्प यांनी अफगाणमध्ये भारताच्या भरीव योगदानाची अपेक्षा व्यक्त केली. पाकिस्तानात नागरिक दहशतवादाने पीडित असले तरीही तो देश आजदेखील दहशतवाद्यांचे नंदनवन आहे, जर पाकिस्तान दहशतवादी संघटनांना साथ देत राहिला तर आम्ही गप्प बसणार नाही, असा थेट इशारा ट्रम्प यांनी देशाला उद्देशून केलेल्या संबोधनादरम्यान दिला.

इराकमध्ये जी चूक करण्यात आली, त्याची अफगाणिस्तानात पुनरावृत्ती करू इच्छित नाही. अफगाणिस्तानात आमच्या प्रयत्नांशी संलग्न झाल्याने पाकिस्तानला सर्वाधिक लाभ झाला असल्याने दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी त्याने आमची मदत सुरूच ठेवावी. दहशतवाद विरोधात पाकिस्तानने आपली बांधिलकी दाखविण्याची वेळ आल्याचे उद्गार ट्रम्प यांनी काढले.

अर्लिंग्टनच्या फोर्ट मेईर सैन्यतळावरून देशाला संबोधित करताना ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लोकांना अफगाण आणि दक्षिण आशियाविषयक अमेरिकेच्या धोरणाची माहिती दिली.

भारताचे कौतुक, पाकला झटका

दक्षिण आशियावरून अमेरिकेच्या व्यूहनीतीचा एक भाग जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि अमेरिकेचा मुख्य सुरक्षा आणि आर्थिक सहकारी भारतासोबत पुढे जात धोरणात्मक भागिदारी विकसित करण्याचा देखील आहे. अफगाणमध्ये स्थैर्य आणण्यात भारताच्या महत्त्वाच्या योगदानाचे आम्ही कौतुक करतो. अमेरिकेसोबतच्या व्यापारात भारत अब्जावधींचे उत्पन्न मिळवित असल्याने त्याने अफगाणिस्तानात आमची अधिक मदत करावी, विशेषकरून तेथील आर्थिक स्थितीत सुधार आणि विकासात हे व्हावे असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी भारताकडून बाळगलेल्या अपेक्षेला पाकिस्तानसाठी मोठा झटका मानले जाते. अफगाणमध्ये भारताच्या अस्तित्वाला पाकने नेहमीच विरोध केलाय.

अफगाणमधून बाहेर पडल्यास…

अफगाणिस्तानातून घाईगडबडीत काढता पाय घेतला तर इस्लामिक स्टेट आणि अल-कायदा तेथे त्वरित सक्रीय होऊ शकतात. गुन्हेगार आणि क्रूर असणारे दहशतवादी सध्या पराभूत ठरलेत. पाकिस्तान आणि भारत दोघांकडे अण्वस्त्रs असल्याने भीती वाटते. त्यांच्यातील तणावपूर्ण संबंध युद्धात बदलू शकतात आणि असे प्रत्यक्षात घडून येऊ शकते. अमेरिकेचे नागरिक युद्ध न लढताच युद्धामुळे थकल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

4000 सैनिक पाठविण्यास मंजुरी

ट्रम्प यांनी एका प्रस्तावावर स्वाक्षरी करत अफगाणिस्तानात आणखीन 400 सैनिक पाठविण्यास मंजुरी दिली. अफगाणमध्ये अमेरिकेची मोहीम अधिकृतरित्या 2014 सालीच समाप्त झाली असली तरीही अमेरिकेचे सैनिक अजूनही अफगाण सैन्याची मदत करत आहेत.

भारताबद्दल अफगाण अनुकूल

युद्धग्रस्त अफगाणच्या विकासावरून भारत 2011 पासूनच सक्रीय आहे, भारताने तेथे अनेक निर्मिती प्रकल्प चालविले असून तालिबानच्या खात्म्यात देखील मदत केली आहे. 2010 च्या गॅलप सर्वेक्षणानुसार अफगाण नागरिक चीन आणि अमेरिकेच्या तुलनेत भारताच्या नेतृत्वाला अधिक पसंत करतात.