|Friday, November 15, 2019
You are here: Home » क्रिडा » पहिल्याच दिवशी भारताचे कुस्तीपटू चितपट

पहिल्याच दिवशी भारताचे कुस्तीपटू चितपट 

ग्रीको रोमन प्रकारात भारतीय मल्लांची सपशेल निराशा

वृत्तसंस्था/ पॅरिस

येथे सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारतीय कुस्तीपटूंना अपयशाचा सामना करावा लागला आहे. ग्रीको रोमन प्रकारात भारतीय मल्ल योगेश, गुरप्रीत सिंग, रविंदर खत्री व हरदीप यांचे आव्हान समाप्त झाले.

सोमवारी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ग्रीको रोमन प्रकारात 71 किलो वजनी गटात झालेल्या लढतीत जपानच्या तकाशी इझुमीने भारताच्या योगेशला 3-1 अशी मात दिली. 75 किलो वजनी गटात गुरप्रीत सिंगला जॉर्जियाच्या मिंडियाने 5-1 असे नमवताना पुढील फेरी गाठली. याशिवाय, 85 किलो वजनी गटात झालेल्या लढतीत भारताच्या रविंदर खत्रीला हंगेरीच्या व्हिक्टोरने 8-0 असे पराजित केले. हा सामना एकतर्फी झाला. प्रारंभापासून आक्रमक खेळणाऱया व्हिक्टोरने या एकतर्फी लढतीत रविंदरला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. 91 किलो गटात लिथुनियाच्या विलियसने हरदीपला 5-2 असे पराभूत केले.

पहिल्याच दिवशी भारताच्या चारही कुस्तीपटूंना पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही भारतीयांच्या पदकाच्या आशा अजून संपुष्टात आलेल्या नाहीत. भारतीयांना हरवणाऱया मल्लांपैकी एकही मल्ल अंतिम फेरीत पोहोचला तर त्याच्या प्रतिस्पर्धी भारतीय मल्लाला रेपीचाज प्रकारात कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळणार आहे.

Related posts: