|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गणेशोत्सवात पोलिसांची राहणार चिपळूण रेल्वस्थानकावर करडी नजर

गणेशोत्सवात पोलिसांची राहणार चिपळूण रेल्वस्थानकावर करडी नजर 

तिकिटांचा काळाबाजार रोखण्याबरोबरच चोरटय़ांवरही राहणार लक्ष,

शांतता समितीच्या बैठकीत दिली माहिती

प्रतिनिधी /चिपळूण

गणेशोत्सवादरम्यान होणाऱया चोऱया व तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी येथील रेल्वे स्थानकावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. तरी सर्वांनी गणेशोत्सव व बकरी ईद सण शांततेत साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे यांनी मंगळवारी पोलीस स्थानकात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले.

यावेळी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी या दरम्यान तिकिटांचा होणारा काळाबाजार व चोऱया या संदर्भात प्रश्न उपस्थित केला असता यावर्षी असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांची करडी नजर राहील, असे आश्वासन जानवे व पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांनी दिले. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी विसर्जन स्थळांचा प्रश्न उपस्थित केला असता या ठिकाणी विजेसह आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच गणेशोत्सव व बकरी ईद सर्वांनी शांततेत व हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा कायम ठेवत साजरा करण्याचे आवाहन या अधिकाऱयांनी केले. यावेळी निराधार फाऊंडेशनचे सचिव नाझीम अफवारे, अमिन परकार, शमशुद्दीन परकार, नगरसेवक करामत मिठागरी, हारूण घारे, जफर कटमाले, जयदीप जोशी आदी उपस्थित होते.