|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » महामार्गावर 50 सीसीटीव्हीचा राहणार ‘वॉच’!

महामार्गावर 50 सीसीटीव्हीचा राहणार ‘वॉच’! 

गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी यंत्रणा सज्ज

पळस्पे ते कसाळपर्यंत पोलिसांची कुमक तैनात

खारपाडा ते कशेडी दरम्यान 16 ठिकाणांवर विशेष लक्ष

राजू चव्हाण /खेड

बाप्पाच्या आगमनास अवघा एकच दिवस उरला असून गणेशभक्त गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. गणेशभक्तांच्या मार्गात कुठल्याही प्रकारचे विघ्न येऊ नये, यासाठी महामार्गावरील खारपाडा ते कशेडी दरम्यानच्या 16 ठिकाणी 50 सीसीटीव्ही कॅमेऱयाद्वारे ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे. तसेच पळस्पे ते कसाळपर्यंतच्या महामार्गावर जादा पोलिसांची कुमक तैनात करून जागता पहारा ठेवला जाणार आहे.

अवघ्या एकाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या आगमनाची साऱयांनाच आतूरता लागली आहे. हजारोंच्या संख्येने चाकरमानी गावाकडे दाखल होऊ लागले असून याचमुळे महामार्ग वाहनांच्या रेलचेलीने ‘हाऊसफुल्ल’ झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेनेही चाकरमान्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी नियोजन आखून त्या दृष्टीने उपाययोजनांचा अवलंब करण्यास सुरूवात केली आहे. महामार्गावरील वाहनचालकांच्या सोयीसाठी व त्यांच्या प्रवासातील अडचणींच्या काळात त्यांना लवकरात-लवकर मदत मिळावी, यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी पोलिसांची जादा कुमक तैनात करून गस्तही वाढवण्यात आली आहे.

महामार्गावर चोख बंदोबस्त

ठाणे येथील राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलीस कार्यालयांतर्गत येणाऱया पळस्पे, वाकण, महाड, कशेडी, चिपळूण, हातखंबा, कसाळ या 475 कि. मी. अंतरात येणाऱया आठ कार्यालयांमार्फत महामार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये 40 अधिकारी व 554 कर्मचाऱयांचा समावेश असून ही सर्व पोलीस यंत्रणा कोकणात जाणाऱया सर्व चाकरमान्यांच्या दिमतीला राहणार आहे. गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासाबरोबरच त्यांच्या मार्गात येणारे कोणतेही विघ्न दूर करण्यासाठी हा फौजफाटा कार्यरत राहणार आहे.

आपत्कालीन मदतीसाठी रूग्णवाहिका व पेनही

महामार्गावर 4 ठिकाणी आपत्कालीन मदत केंद्रे, तर 5 ठिकाणी विशेष पोलीस सहाय्यक केंद्रेही उभारण्यात आली आहेत. खारपाडा, हमरापूर, पेण, वडखळ या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन चाकरमान्यांना मनस्तापालाच समोर जावे लागते. यासाठी या 4 ठिकाणी विशेष पोलीस चौक्या उभारण्यात आल्या असून आपत्कालीन मदतीसाठी रूग्णवाहिका व पेनही तैनात करण्यात आली आहे. महामार्ग अपघातांच्या दृष्टीने शापीतच बनलेला असल्याने अपघातांना आळा घालून प्रवासादरम्यान चाकरमान्यांना होणारा मनस्ताप दूर करण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांकडून विशेष जनजागृती मोहीमही राबवण्यावर भर दिला जात आहे.

पर्यायी मार्गाची व्यवस्थाही

बऱयाचदा बेदकारपणे वाहने हाकणाऱया वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडून वाहतुकीचा खोळंबा होत असतो. या पार्श्वभूमीवर वाहतुकीचा खोळंबा झाल्यास पर्यायी मार्गाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. महामार्गावर वडखळ, माणगाव, कोलाड या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न सतावत असतो. या ठिकाणी ओव्हर टेकींगसाठी येवू नये, यासाठी रस्त्याच्या मध्यभागी दुभाजके उभारण्यात आली आहेत. तसेच या ठिकाणी वाहने थांबणार नाहीत, याकडे विशेष लक्ष देऊन त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेटस् उभारण्यात आले आहेत.