|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » हिवरे – देवसूत भर पावसात नळ कोरडे

हिवरे – देवसूत भर पावसात नळ कोरडे 

प्रतिनिधी/ वाळपई

बाहेर धुवांधार पाऊस पडत असताना हिवरे देवसू वाडय़ावरील घरांमध्ये मात्र पिण्याचे पाण्याच्या टंचाईने नागरिकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. सरकार याकडे दुर्लक्ष करीत असून परिस्थिती अशीच राहिल्यास पाणी पुरवठा कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

ठाणे पंचायत क्षेत्रातील हिवरे गावात गेल्यावर्षी अशाच प्रकारची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी धावाधाव करुन वेगवेगळ्य़ा स्तरावर उपाययोजना केली होती. आता याच गावातील देवसू वाडय़ावर पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. वाडय़ावरील पाण्याचे नळ कोरडे पडले असून याबाबत वाळपईतील अधिकाऱयांना माहिती देऊनही कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. याबाबत बोलताना काशिनाथ तानोडे यांनी सांगितले की, गावात टँकर येत आहे मात्र परवानगी नसल्याने टँकरवाले या वाडय़ावर पाण्याचा पुरवठा करण्यास नकार देत आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नळाना पाणी नाही व टँकरची सोय नाही अशी विचित्र परिस्थिती या वाडय़ावर निर्माण झाली आहे.

वाडय़ावरील नागरिकांना सध्या पावसाच्या पाण्यावर आपली गरज भागवावी लागत आहे. जेवणासाठीही त्याच पाण्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे पुनम गावकर यांनी सांगितले.

याबाबत माहिती देताना स्नेहा तानोडे यांनी सांगितले की, गावात असलेल्या विहिरींची साफसफाई करुन पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती. पाणी पुरवठा खात्याने त्यावर पंप बसवून सोय केली होती मात्र काही महिन्यांपूर्वी सदर पंच अचानकपणे काढून नेण्यात आला. त्यामुळे पाणी पुरवठा खंडित झाला आहे.

पंच सत्यवान गावकर यांनी सांगितले की, याबाबत अनेक वेळा वाळपई पाणी परवठा अधिकाऱयांना माहिती देण्यात आली होती मात्र कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही, असे सांगितले.

Related posts: