|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सरपंच निवडीसाठी सातवी समतुल्य शैक्षणिक पात्रता चालणार

सरपंच निवडीसाठी सातवी समतुल्य शैक्षणिक पात्रता चालणार 

कणकवली : ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक आता थेट पद्धतीने करण्यात येणार असल्याने या पदासह नामनिर्देशनपत्राची प्रक्रीया संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या सरपंच निवडीसाठी शैक्षणिक पात्रता सातवी पास किंवा सातवी इयत्तेशी समतुल्य अर्हता प्राप्त असण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबत 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तीकडे (उमेदवाराकडे) सातवी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा त्या समतुल्य शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र असण्याची गरज आहे. याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले असून सातवी उत्तीर्ण प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवाराला त्या समतुल्य प्रमाणपत्राच्या आधारे सरपंचपदी विराजमान होता येणार आहे.

थेट सरपंच निवडीबाबत शासनस्तरावरून गेले काही महिने जोरदार हालचाली सुरू होत्या. याबाबतचा अध्यादेश 19 जुलै 2017 रोजी राज्य शासनाने जारी केला होता. त्यामुळे आता जिल्हय़ातील नोव्हेंबर ते फेब्रुवारी 2018 पर्यंत होणाऱया 340 ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याची अंमलबजावणी येत्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये करण्यात येणार आहे.

नामनिर्देशन संगणकीकृत

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदासह नामनिर्देशनाची प्रक्रीया संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणार आहे. सरपंच पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करताना ज्या ग्रा.पं.च्या प्रभागातून नामनिर्देशनपत्र भरण्यात आले आहे, त्या ग्रा.पं.चे नाव व प्रभाग क्रमांक स्पष्टपणे नमूद करावे लागणार आहेत.

अवलंबितांचीही माहिती द्यावी लागणार

  राखीव जागेवरून निवडणूक लढविणाऱया उमेदवारांनी जात पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र जातीच्या दाखल्याची सत्यप्रत जोडायची आहे. तसेच नामनिर्देशनपत्राच्या छाननी प्रसंगी मूळ जाती प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास जातीची वैधता तपासणीकरिता जात वैधता पडताळणी समितीकडे अर्ज केल्याचा पुरावा जोडणे आवश्यक केले आहे. या सोबत उमेदवाराला घोषणापत्र सादर करावे लागणार असून जंगम व स्थावर मालमत्तेबाबत तपशील देताना प्रत्येक बाबीचा स्वतंत्र तपशील द्यावा लागणार आहे. अवलंबित व्यक्ती म्हणजे उमेदवार त्याची पत्नी, पती, स्वतंत्र उत्पन्नाची साधने नसलेली व पूर्णत: उमेदवारावर अवलंबून असलेली मुले व मुली यांच्याबाबत माहिती सादर करायची आहे.

प्रमाणपत्र नामनिर्देशनपत्रासोबत जोडावे लागणार

  सरपंच पदासाठी नामनिर्देशनपत्र सादर करताना 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्या पूर्वी जन्मलेल्या इच्छुक उमेदवाराकडे सातवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, किंवा सक्षम प्राधिकाऱयाचे उमेदवाराने सातवी इयत्तेशी समतुल्य शैक्षणिक अर्हता प्राप्त केले असल्याबाबत प्रमाणपत्र नामनिर्देशनपत्रासोबत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. या निवडणुकीत निवडून आल्यानंतर सरपंच म्हणून काम करण्यास तयार असल्याबाबतचे घोषणापत्र उमेदवाराला सादर करावे लागणार आहे.

  गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत माहिती

  संबंधित उमेदवाराने नामनिर्देशनपत्रासोबत पूर्ण झालेले वय, सरपंच म्हणून निवडून येण्यास अपात्र नाही, उमेदवार ग्रा.पं.चा ठेकेदार नाही, ग्रा.पं.च्या नियमानुसार देय असलेली कोणत्याही रकमेची थकबाकी शिल्लक ठेवलेली नाही, याबाबत घोषणापत्र उमेदवाराला करावे लागणार आहे. या संबंधित उमेदवाराने गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत घोषणापत्र द्यायचे असून उमेदवाराने स्वत: व पत्नी, पतीच्या व्यवसायाबाबत तपशीलही द्यावा लागणार आहे.

थकीत रक्कम व बँकांच्या कर्जांचा तपशील

  सार्वजनिक, वित्तीय, संस्था यांच्याकडील व शासकीय, निमशासकीय संस्थांकडील दायित्वे थकीत रकमांचा तपशील उमेदवाराला द्यावा लागणार आहे. बँकांकडून, किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेली कर्जे, शासकीय, निमशासकीय देणी आदींबाबत माहिती सादर करावी लागणार आहे. 12 सप्टेंबर 2001 नंतर दोन पेक्षा जास्त अपत्ये झाल्यास अपात्र ठरण्याबाबत घोषणापत्र करावे लागणार आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर 30 दिवसांत निवडणूक खर्चाचा हिशेब विहीत पद्धतीने सादर न केल्यास सरपंच राहण्यास अनर्ह, अपात्र ठरण्याबाबतचे घोषणापत्र संबंधित उमेदवाराने जाहीर करायचे आहे.