|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कोकणातील चार नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी 10 कोटी

कोकणातील चार नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी 10 कोटी 

कणकवली : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नदी, ओढे, नाल्यांमधील गाळ काढणे, सरळीकरण, खोलीकरण आदी कामांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम आखण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोकणातील चार नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निश्चित होते. यात गांधारी, जगबुडी, अर्जुना व जानवली या नद्यांचा समावेश होता. या चारही नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी 2016-17 अंतर्गत प्रत्येकी अडीच कोटी असे दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यात जानवली नदीवर आठ, तर उर्वरित तीन नद्यांवर मिळून एकूण 55 सिमेंट नाला बांध होणार आहेत.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी या नद्या पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी पुढाकार घेतला होता. तत्कालिन प्रांताधिकारी संतोष भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जानवली नदीचा याबाबतचा आराखडाही तयार करण्यात आला होता. जानवली नदीच्या पुनरुज्जीवनासाठी 36.40 कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. या नदीपात्रालगतची पाच-पाच गावे दरवर्षी जलसमृद्ध करण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून असणार आहे. यातून सिमेंट बंधारे, गाळ काढणे व त्याअनुषंगिक कामांचा समावेश होता. जलपुरुष राजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील गांधारी, जगबुडी, अर्जुना व जानवली या चार नद्यांचा विकास आराखडा तयार केला होता. नदीपात्रालगतच्या गावांचा सर्व्हे केल्यानंतर या चार नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी 230 कोटींचा आराखडा तयार केला असून पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने ही योजना राबविण्यासाठीचा हा आराखडा होता. त्यानुसार या नद्यांच्या माध्यमातून विविध पुनरुज्जीवनाच्या कामांसाठी आता 2016-17 अंतर्गत निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

रायगड जिल्हय़ातील महाड तालुक्यातील गांधारी, रत्नागिरी जिल्हय़ातील खेड तालुक्यातील जगबुडी व राजापूर तालुक्यातील अर्जुना, तर सिंधुदुर्गमधील कणकवली तालुक्यातील जानवली या चार नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आता प्रत्येकी अडीच कोटी म्हणजे एकूण 10 कोटी रुपये पहिल्या वर्षासाठी मंजूर करण्यात आले आहेत. यात नद्यांवर बांध बांधणे, गाळाने भरलेले डोह उपसून पूर्ववत करणे, साठलेल्या पाण्याचा उपयोग आधुनिक शेती व रोजगार निर्मितीसाठी करणे या अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. त्यानुसारच आराखडे तयार केले असून त्यानुसारच ही कामे होणार आहेत. मंजूर केलेल्या निधीमधून जगबुडी व गांधारी नदीवर प्रत्येकी 11, अर्जुना नदीवर 25, तर जानवली नदीवर 8 असे एकूण 55 सिमेंट नालाबांध असणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

मृद व जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या माध्यमातून या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. पावसाळा संपताच ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. जलयुक्त शिवार अभियान ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. त्याअनुषंगाने याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

2016-17 साठी हा निधी उपलब्ध झाला असून पुढील पाच वर्षांसाठी राबवायच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजन व आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या निधीच्या योग्य विनियोगाच्या माध्यमातून नदी किनाऱयालगतची गावे समृद्ध व संपन्न होण्यास निश्चित मदत होणार आहे.