|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिवकालीन वास्तूसंग्रहालयासाठी हवा जनतेचा पुढाकार

शिवकालीन वास्तूसंग्रहालयासाठी हवा जनतेचा पुढाकार 

सिंधुदुर्ग : शिवछत्रपतींच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या आपल्या या सिंधुदुर्गात होऊ घातलेल्या शिवकालीन वास्तू संग्रहालयाच्या पूर्ततेसाठी अवघ्या 40 लाख निधीची कमतरता जाणवत आहे. आपल्या 50 वर्षांच्या तपश्चर्येतून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी जगभर हिंडून प्राप्त केलेला हा शिवकालीन खजाना सिंधुदुर्गाबाहेर जाऊ नये, अशी इच्छा असेल तर तमाम सिंधुदुर्गवासीयांनी कर्तव्याच्या भावनेतून तात्काळ मदतीचा हात पुढे करणे अत्यंत गरजेचे आहे. सव्वा कोटी खर्चाच्या या संग्रहालयाचे 60 टक्के काम बाबासाहेबांनी पूर्ण केले असून आता उर्वरित जबाबदारी सिंधुदुर्गवासीयांनी पेलणे आवश्यक आहे.

 दिल्लीचे मुघल साम्राज्य, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, मुरुड-जंजिऱयाचे सिद्दी आणि गोव्याचे पोर्तुगिज अशा या यवनांच्या सत्तासंघर्षात संपूर्ण महाराष्ट्र होरपळत असताना छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. आपली सिंधुदुर्गची भूमी ही याच इतिहासाचा एक भाग आहे. शिवरायांनी या भूमीत विजयदुर्ग किल्ला जिंकून घेत त्याची डागडुजी केली. सुरतेवर छापा घालून लुटून आणलेली संपत्ती सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीकरीता खर्ची घातली. अदिलशहाकडून रेडीचा यशवंतगड जिंकून घेत त्याची डागडुजी केली. छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या पित्याचे शिवराय मंदीर सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधले. छत्रपती शिवरायांचे असे मंदीर व शिवरायांच्या हाता-पायाचे ठसे फक्त सिंधुदुर्गातच पाहायला मिळतात. छत्रपती शिवरायांची भवानी तलवार जी आज इंग्लंडमध्ये आहे, ती महाराजांना याच भूमीतून मिळाली होती. सरखेल कान्होजी आंग्रेंनी बांधलेला देवगडचा किल्ला, बाराव्या शतकात बांधलेले राजा भोजचे किल्ले, सावंतवाडी संस्थानिक फेंड सावंत राजांनी बांधलेला भरतगड असे अनेक गड येथे आहेत. या सर्व गोष्टी समृद्ध इतिहासाची साक्ष देत आहेत.

आपल्या पुढील पिढय़ांसाठी संग्रहालय हवेच

   सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची आठवण करून देण्याचे कारण हेच की आपला हा ज्वलंत इतिहास, हाच ठेवा पुढील पिढीसाठी जतन व्हावा, ही काळाची गरज आहे. इंग्रजी माध्यमाच्या अभ्यासक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांना गायब केले जात आहे. नव्या पिढीला हा इतिहास माहीतच नाही. तो त्यांना आहे तसा परिणामकारकरित्या समजावून देणे, सादर करणे यासाठीच हे देशातील पहिले शिवकालीन वास्तूसंग्रहालय बाबासाहेब पुरंदरेंनी आपल्या सिंधुदुर्गसाठी दिले आहे. आपला ऐतिहासिक ठेवा जतन करणे व तो पुढील पिढीस उपलब्ध करून देणे मोठे राष्ट्रीय कार्य आहे. शिवकालीन ऐतिहासिक वास्तूसंग्रहालयाच्या माध्यमातून हे कार्य निश्चितपणे पार पडणार आहे. त्यामुळे या राष्ट्रीय कार्यात प्रत्येक सिंधुदुर्गवासीयांचा सहभाग राहिलाच पाहिजे.

असं असेल हे शिवकालीन ऐतिहासिक कलादालन

   ऐतिहासिक शिवकालीन कलादालन एक वैशिष्टय़पूर्ण. शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असलेले ऐतिहासिक वास्तूसंग्रहालय असणार आहे. या संग्रहालयात शिवछत्रपतींच्या काळातील एक हजार तलवारी, पाचशे भाले, साडेतिनशे बंदुका, वाघनखे, दांडपट्टे, ढाली, तोफा, चिलखते, शिरस्त्राणे, तोफगोळे, शिवरायांची हत्सलिखित पत्रे, दुर्मिळ लिखित दस्तऐवज, शिवरायांना प्रत्यक्ष समोर बसवून देश-विदेशातील प्रख्यात चित्रकारांनी काढलेली महाराजांची तैलचित्रे ही या कलादालनाची वैशिष्टय़े आहेत. एवढेच नव्हे तर शिवकालीन वस्त्रालंकार, सोन्या, चांदीच्या धाग्यांनी विणलेल्या पैठणी अशा अनेक मौल्यवान वस्तू या वस्तूसंग्रहालयात पाहता येणार आहेत.

   या कलादालनात नुसता इतिहास पाहता येणार नसून तो अनुभवताही येणार आहे. पाश्चिमात्य म्युझियमच्या आधारावर येथेही मिनी थिएटर असेल, ज्यात कोकणातील महत्वाच्या ऐतिहासिक घटना, लढाया, येथील शूर योध्यांच्या पराक्रमाच्या कथा चित्रफितीद्वारे दाखविल्या जाणार आहेत. एवढेच नव्हे, तर छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळय़ाच्या क्षणांचे जिवंत सादरीकरण करण्याची सोयही या कलादालनात उपलब्ध होणार आहे.

आता जबाबदारी आहे आपली

  कसाल-मालवण मार्गावरील सुकळवाड येथे बाजारपेठेनजीक रस्त्याला लागूनच या वस्तूसंग्रहालयाची उभारणी गेली दोन वर्षे सुरू आहे. संग्रहालयाचे साठ टक्के काम पूर्ण झाले आहे. सव्वा कोटी रुपये खर्चाच्या या कलादालनाचा 80 लाख रुपयांचा आर्थिक भार माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाने उचलला आहे. स्वत: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत. बाबासाहेबांनी आयुष्यभर भटकंती करून जमा केलेला अनमोल ठेवा या वस्तू संग्रहालयासाठी दिला आहे. सिंधुदुर्गवरील प्रेमापोटी त्यांनी हे केलं आहे. अशा या ऐतिहासिक कलादालनासाठी बाबसाहेबांनी दिलेले योगदान, माजी आमदार उपरकर व त्यांच्या मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाने घेतलेले परिश्रम, शिवप्रेमी दात्यांनी दिलेले योगदान यातून या संग्रहालयाचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. आता उर्वरित कामासाठी अवघ्या 40 ते 50 लाखाची गरज आहे. हा भार उचलण्यासाठी सिंधुदुर्गवासीयांनी आता पुढे आलेच पाहिजे.

सिंधुदुर्गवासीयांनी ठरवलं, तर..

  जिल्हावासीयांनी ठरवलं, तर अवघ्या काही दिवसांतच हा निधी अगदी सहजपणे उभा राहू शकतो. जिल्हय़ातील शिक्षक, शासकीय कर्मचारी, विद्यार्थी, व्यापारी, राजकीय नेते, पुढारी, लोकप्रतिनिधी, उद्योजक, डॉक्टर, वकील, बँका, विविध संस्था या प्रत्येकाने छत्रपतींवरील पेम व राष्ट्रीय भावनेतून पुढे येऊन या आर्थिक मदतीत खारीचा वाटा उचलला, तर आपल्या आताच्या व येणाऱया पुढील पिढय़ांसाठी हे छान असे वस्तू संग्रहालय दिमाखात उभे राहील व या संग्रहालयाच्या उभारणीत आपलाही वाटा राहिल्याचे समाधान प्रत्येकाला निश्चितपणे मिळेल. उद्योग व्यवसायानिमित्त मुंबई-पुण्यात स्थाईक झालेल्या सिंधुदुर्गवासीयांकडूनही मोठय़ा अपेक्षा आहेत.

सिंधुदुर्गवासीयांनो मदतीचा हात द्या!

  या संस्थेची वेबसाईट www.shivsindhugarjana.com अशी असून ई-मेल sindhugarjana@gmail.com असा आहे. त्यांच्यासाठी सारस्वत बँकेत खाते उघडले असून त्या खात्याचा अकाऊंट नंबर 078100100001081, आएफएससी कोड ‘एसआरसीबी0000078’ असा आहे. या संदर्भात सविस्तर माहिती हवी असल्यास 9422434467 / 9422055348 / 9405928853  हे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.