|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तत्कालीन बीडीओ मडके, लेखापाल मानेला अटक

तत्कालीन बीडीओ मडके, लेखापाल मानेला अटक 

प्रतिनिधी/ जत

जत तालुक्यातील मनरेगा घोटाळय़ाच्या एकुंडी प्रकरणातील संशयित आरोपी तथा तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके व लेखापाल प्रवीण माने या दोघांना सोमवारी जत पोलिसांनी अटक केली. एकुंडी येथील रोहयो घोटाळय़ातील हे आरोपी अनेक दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होते. अखेर सोमवारी त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यांना सोमवारी जत न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने या दोघा आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात एकूण नऊ आरोपींचा समावेश आहे.  यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर तीन जणांना तात्पुरता जामीन मिळाला असून, आणखीन एक आरोपी फरार आहे.

जत तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. तालुक्यातील काशिलिंगवाडी, बाज व एकुंडी येथील  रोहयो घोटाळय़ाची चौकशी गेल्या पाच महिन्यांपासून सुरू आहे. यातील एकुंडी येथील बोगस शेततलावाचे प्रकरण चांगलेच गाजले आहे. शेततलाव न खोदताच सुमारे 25 लाख रूपये उचलल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी नऊ जणांवर दोषारोपत्र ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, याप्रकरणी तपासाअंती तत्कालीन गटविकास अधिकारी ओमराज गहाणे, ज्ञानदेव मडके, लेखापाल प्रवीण माने, रोजगार सेवक परमानंद गुरवसह तांत्रीक अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर अशा नऊ जणांवर चार महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरू आहे.  परंतु आरोपी मिळण्यास विलंब लागत होता, आजवर आठ आरोपींना पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. तर एकजण अद्याप पसार असून, त्यासही लवकरच अटक करू. शिवाय अपहार प्रकरणात एकुंडी गावातील अन्य संशयीतांची नावे निष्पन्न झाल्यास कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांच्यावर कडक कारवाई करू असे तपास अधिकारी रणजित गुंडरे यांनी सांगितले. तर याप्रकरणी सरकारी वकील म्हणून ऍड. प्रशांत जाधव यांनी काम पाहीले आहे.

सोशल ऑडीट गतीने राबवण्याची गरज

जत तालुक्यातील हा मोठा घोटाळा आहे. तालुक्यातील सर्रास गावात नरेगा योजनेत गैरव्यवहार झाला आहे. या सगळय़ांच गावांचे सोशल ऑडीट करण्याची गरज आहे. मागच्याच महीन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या बैठकीत सदस्य विक्रम सावंत यांनी जत तालुकयातील नरेगाचे सोशल ऑडीट करण्याची मागणी केली आहे. तालुक्यात सोशल ऑडीट सुरू झाले असले तरी राजकीय दबावाखाली हे सोशल ऑडीट दाबण्याचे प्रकार होत असल्याची चर्चा आहे.

Related posts: