|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नुवे व कुडतरीत काँग्रेसचे वर्चस्व

नुवे व कुडतरीत काँग्रेसचे वर्चस्व 

प्रतिनिधी/ मडगाव

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या नुवे व कुडतरी मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या पोट निवडणुकीची मतमोजणी काल झाली. त्यात दोन्ही मतदारसंघात काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व ठेवले. नुवे मतदारसंघातून रूबेन डिकॉस्ता तर कुडतरी मतदारसंघातून मॉरेनो रिबेलो हे विजयी झाली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत नुवे मतदारसंघातून जिल्हा पंचायत सदस्य विल्प्रेड उर्फ बाबाशान डिसा हे आमदार म्हणून निवडून आल्याने या मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. तर कुडतरी मतदारसंघाचे जिल्हा पंचायत सदस्य क्लाफास डायस हे कुंकळळी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्याने येथील जागा रिक्त झाली होती.

पोट निवडणुकीत नुवे मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा पाठिंबा मिळालेले रूबेन डिकॉस्ता यांना 4780 मते मिळाली तर त्याचे प्रतिस्पर्धी मारियो परेरा यांना 2676 मते मिळाली. या मतदारसंघात एकूण 7545 मतदान झाले होते. या ठिकाणी रूबेन डिकॉस्ता व मारियो परेरा यांच्यात थेट लढत झाली होती.

कुडतरी मतदारसंघातून काँग्रेसच्या तीन आमदारांचा पाठिंबा मिळालेले मॉरेनो रिबेलो यांना 5355 तर त्याचे प्रतिस्पर्धी दियोनिज सार्दिन यांना 3414 मते मिळाले. तर कॉन्सेसांव डायस यांना 1033 मते मिळाली व ते तिसऱया स्थानावर राहिले. या मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध काँग्रेस अशीच लढत झाली. पण विजयी उमेदवार मॉरेनो रिबेलो यांना कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, कुंकळळीचे आमदार क्लाफास डायस व वेळळीचे आमदार फिलीप नेरी यांचा पाठिंबा लाभला होता.

पूर्वी हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसकडेच होते. ते पुन्हा काँग्रेसकडेच गेले. या दोन्ही मतदारसंघात इतर पक्षांनी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीकोनातून महत्व दिले नव्हते. सकाळी 8.30 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला व एका तासास म्हणजे 9.30 वाजता मतमोजणी पूर्ण झाली.