|Monday, August 19, 2019
You are here: Home » क्रिडा » ग्रँडस्लॅममध्ये शरापोव्हाचे विजयी पुनरागमन

ग्रँडस्लॅममध्ये शरापोव्हाचे विजयी पुनरागमन 

हॅलेप, कोन्टा, सॉक यांना धक्का, व्हीनस, वोझ्नियाकी, क्विटोव्हा, इस्नेर, सिलिक दुसऱया फेरीत

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

रशियाच्या मारिया शरापोक्हाने डोपिंगबंदीनंतर पहिल्याच ग्रँडस्लॅममध्ये खेळताना जागतिक द्वितीय मानांकित सिमोना हॅलेपला पराभवाचा धक्का देत अमेरिकन ओपन स्पर्धेची झोकात सुरुवात केली. याशिवाय जोहाना कोन्टा, रॉबर्टा व्हिन्सी, यांकोव्हिक, जॅक सॉक, टॉमिक यांनाही पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडावे लागले. मारिन सिलिक, इस्नेर, क्वेरी, व्हीनस विल्यम्स, गार्बिन मुगुरुझा, क्विटोव्हा, अलेक्झांडर व्हेरेव्ह यांनी विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली.

शरापोव्हाने डोपिंगबंदीचा 15 महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर गेल्या एप्रिलपासून काही स्पर्धांत भाग घेतला होता. पण ग्रँडस्लॅममध्ये ती पहिल्यांदाच खेळत होती. तिने रोमानियाच्या हॅलेपवर सुमारे पावणेतीन तास रंगलेल्या लढतीत 6-4, 4-6, 6-3 अशी मात करून दुसरी फेरी गाठली. आतापर्यंत या दोघींत सात लढती झाल्या असून सर्व लढती शरापोव्हानेच जिंकल्या आहेत. सर्बियाच्या अलेक्सांड्रा प्रुनिकने या स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल देताना सातव्या मानांकित ब्रिटनच्या जोहाना कोन्टाचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव केला.

व्हीनस, वोझ्नियाकी, मुगुरुझाचे विजय

महिलांच्या अन्य सामन्यात अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सने स्लोव्हाकियाच्या क्हिक्टोरिया कुझमोव्हावर 6-3, 3-6, 6-2 अशी मात केली. 37 वषीय व्हीनसने या वर्षात दोन ग्रँडस्लॅम स्पर्धांची (ऑस्ट्रेलिया व विम्बल्डन) अंतिम फेरी गाठली होती. तिचीच देशवासी स्लोअन स्टीफेन्सने दीर्घ काळानंतर पुनरागमन करताना इटलीच्या रॉबर्टा व्हिन्सीचे आव्हान 7-5, 6-1 असे संपुष्टात आणले. पाचव्या मानांकित डेन्मार्कच्या कॅरोलिन वोझ्नियाकीने दुसरी फेरी गाठताना रोमानियाच्या मिहेला बुझारनेस्क्मयूचा 6-1, 7-5 असा पराभव केला. ग्रँडस्लॅममधील तिचा हा 100 वा विजय होता. विम्बल्डन चॅम्पियन गार्बिन मुगुरुझाने अमेरिकेच्या व्हार्वरा लेपचेन्कोचा 6-0, 6-3 असा धुव्वा उडविला. झेकच्या 13 व्या मानांकित पेत्र क्विटोव्हानेही विजयी सलामी देताना सर्बियाच्या येलेना यांकोव्हिकचे आक्हान 7-5, 7-5 असे संपुष्टात आणले.

इस्नेर, क्वेरी दुसऱया फेरीत

पुरुष विभागात अँडी मरे, नोव्हॅक ज्योकोव्हिक, वावरिंका, निशिकोरी, रेऑनिक यासारख्या बडय़ा खेळाडूंच्या गैरहजेरीत अमेरिकेच्या जॉन इस्नेर व सॅम क्वेरी यांनी प्रभावी प्रदर्शन करीत दुसरी फेरी गाठली. दहाव्या मानांकित इस्नेरने फ्रान्सच्या पीयर हय़ुजेस हर्बर्टचा 6-1, 6-3, 4-6, 6-3 असा तर क्वेरीने फ्रान्सच्याच गिलेस सायमनचा 6-4, 6-3, 6-4 असा पराभव केला. अमेरिकेच्याच जॅरेड डोनाल्डसन व स्टीव्ह जॉन्सननेही विजय मिळविले. पण 13 क्या मानांकित जॅक सॉकला ऑस्टेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनकडून 6-2, 7-6 (12-10), 1-6, 5-7, 6-4 अशी हार पत्करावी लागल्याने त्याला स्पर्धेबाहेर पडावे लागले. ऑस्टेलियाच्या बर्नार्ड टॉमिकलाही पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्याला गिलेस म्युलरने 3-6, 6-3, 6-4, 6-4 असे नमविले.

व्हेरेव्हचा संघर्ष, सिलिक विजयी

जर्मनीच्या चौथ्या मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हला दुसरी फेरी गाठताना विजयासाठी संघर्ष करावा लागला. ग्रँडस्लॅममध्ये खेळणारा बार्बाडोसचा पहिला खेळाडू डॅरियन किंगवर त्याने 7-6 (9-7), 7-5, 6-4 अशी मात केली. त्याची पुढील लढत क्रोएशियाच्या बोर्ना कोरिकशी होईल. क्रोएशियाच्या मारिन सिलिकने अमेरिकेच्या टेनीस सँडग्रेनचा 6-4, 6-3, 3-6, 6-3 असा पराभव केला. विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर सिलिकचा हा पहिलाच विजय होता. त्याची पुढील लढत जर्मनीच्या फ्लॉरियन मेयरशी होईल. मेयरने ब्राझीलच्या रॉजेरिओ डुट्रा सिल्वावर 7-5, 0-6, 6-3, 6-4 अशी मात केली.