|Monday, March 30, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘नो डॉल्बी’ : पालकमंत्री

गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘नो डॉल्बी’ : पालकमंत्री 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शहरात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणालाही डॉल्बी लावू दिला जाणार नाही. डॉल्बीमुक्तीला प्रतिसाद देणाऱया मंडळांना मदत केंली जाईल. डॉल्बीसह मिरवणुकीत सहभागी होणाऱया मंडळांना महाद्वार रोडवर प्रवेश दिला जाणार नाही. तसेच त्यांच्यावर ध्वनीप्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार गुन्हे दाखल केली जातील, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिला.  तसेच पोलिसांनी डॉल्बीमालकांना 144 अंतर्गत नोटीसा बजावाव्यात, अशी सुचना करतानाच कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणूक ऐतिहासिक, राज्याला दिशा देणारी डॉल्बीमुक्त अशीच होईल, असे ठणकावले.

शहरातील 35 मंडळांच्या पदाधिकाऱयांची बैठक सोमवारी दुपारी पोलीस मुख्यालयात झाली. या बैठकीत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव, विसर्जन मिरवणुकीसाठी पालकमंत्री पाटील यांनी आवाहन केले. यावेळी महापौर हसीना फरास, आमदार अमल महाडिक, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, शहर पोलीस उपाधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल, डॉ. संदीप कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

डॉल्बीधारकांवर 144 अंतर्गंत कारवाईचे निर्देश

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही मंडळाने डॉल्बी लावायचा प्रयत्न केला तर प्रशासन त्याच्यावर कारवाई करण्यात मागेपुढे पाहणार नाही. ध्वनिप्रदुषण कायद्यांतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.  जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी कायद्याचा अभ्यास करून केवळ डॉल्बी पुरवणाऱयांना कलम 144 अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देशही दिले.

डॉल्बीमालकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा

ते पुढे म्हणाले,  डॉल्बीमालकांनी पोलीस मुख्यालयात डॉल्बीची उपकरणे जमा करावीत. ही उपकरणे त्यांना गणेशोत्सावानंतर परत केली जातील. प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद न देणाऱयांची डॉल्बीची उपकरणे जप्त केली जातील. डॉल्बीमालकांवर गुन्हेही दाखल केले जातील, असा इशारा त्यांनी दिला.

डॉल्बी लावणाऱया मंडळांना मिरवणुकीत प्रवेश नाही

विसर्जन मिरवणुकीत महाद्वारावर येणाऱया प्रत्येक मंडळाची कसून तपासणी करण्यात येईल. आक्षेपार्ह डॉल्बी सापडतील त्यांना मिरवणुकीत प्रवेश दिला जाणार नाही. तरीही डॉल्बीचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर ध्वनी प्रदूषण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होतील, पण प्रशासन गर्दीची काळजी करणार नाही, असे स्पष्ट केले. या गुन्हय़ामध्ये 5 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉल्बी जॅमरमुळे डॉल्बीधारकांचे नुकसान शक्य

डॉल्बी जॅमरबाबतच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे. असे उपकरण मिळाले आहे की, डॉल्बी सिस्टीममधील महत्वाचा भाग निकामी होईल की, ज्याची खरेदी पुणे-मुंबईशिवाय होऊ शकणार नाही. त्यामुळे डॉल्बीमालकांना याचा विचार करून डॉल्बी द्यायचा की नाही, हे ठरवावे, असेही त्यांनी सांगितले. आबालवृध्दांचा सहभाग असणारी ऐतिहासिक, डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक काढूया. विसर्जन मिरवणुकीसाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

विसर्जन मिरवणुकीत 80 ध्वनीमापक वापरणार : नांगरे पाटील

विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील म्हणाले, आबालवृद्धांसाठी डॉल्बीचे परिणाम घातक सिध्द झाले आहेत. ध्वनी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालय अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल. जिह्यात ध्वनीक्षमता मोजण्यासाठी 80 डेसीबल मीटर उपलब्ध आहेत. सांगितले. राजर्षी शाहू महाराजांच्या या पुरोगामी विचारांच्या शहरात डॉल्बी मुक्तीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळावा, सव्वाशे वर्षांची परंपरा असणाऱया गणेशोत्सवात डॉल्बीवरील खर्च  विधायक कामासाठी वापरावा, असे आवाहन केले. तसेच मिक्सर, बेस आणि बेड या तीनस्तरीय उपकरणांना परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

शहरात डॉल्बीसाठी हट्टाहास का : संजय मोहिते

पोलीस अधीक्षक संजय मोहिते म्हणाले, कोल्हापुरात 653 सार्वजनिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे. डॉल्बीमुक्तीसाठी 99 टक्के मंडळांनी सहकार्य केले आहे. विसर्जन मिरवणूकही डॉल्बीमुक्त करून विधायकतेच्या दृष्टीने पावले उचलूया. ठराविक लोकांसाठी 99 टक्के लोकांची शांतता भंग करायची का, इचलकरंजी, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, हुपरीत डॉल्बी नाही, मग कोल्हापुरात हा हट्टाहास का, असा प्रश्न करत चांगला मार्ग काढण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘टू टॉप, टू बेस’ला परवानगी नाहीच : सुहेल शर्मा

काही मंडळांनी दोन बॉक्सवर डॉल्बीला परवानगी द्यावी, अशी मागणी केली. यावर  अपर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी आम्हाला दोन किंवा तीन बॉक्स या बाबी समजत नाहीत तर ध्वनी लहरींची क्षमता समजते, त्यामुळे ध्वनी प्रदूषण करणाऱयांवर कारवाई केली जाईल, असे सुनावले.

राजारामपुरीत 97 टक्के मंडळांचे सहकार्य : डॉ. अमृतकर

शहर पोलीस उपाधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी राजारामपुरीत 97 टक्के मंडळांनी डॉल्बीमुक्तीसाठी सहकार्य केले. आता चांगला पायंडा पाडण्यासाठी डॉल्बीला मुठमाती द्या, असे आवाहन केले. डॉ. प्रशांत कुलकर्णी यांनी डॉल्बीच्या दुष्पपरिणामांची माहिती दिली.

चौकटी

कोल्हापूरचा गणेशोत्सव राज्यासाठी आदर्श ठरावा

पोलीस विरोधी नाहीत, तुमचेच रक्त आमच्यात आहे. ध्वनिप्रदुषण कायद्याची अंमलबजावणी न केल्यास वरिष्ठांच्या नोकऱया धोक्यात येतील. त्यामुळे मंडळांनी गांभिर्याने घेतल्यास कोल्हापूरचा डॉल्बीमुक्त गणेशोत्सव राज्यासाठी आदर्शवत ठरेल, असा विश्वास विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे पाटील यांनी व्यक्त केला.

मिक्सर असलेल्यांवर कारवाई होणारच

गणेश आगमन मिरवणुकीत बॉक्सवर बंदी घातलेली नाही. जेथे मिक्सर वापरले गेले तेथे कारवाई झाली आहे. पोलिसांकडून कोणतीही कमिटमेंट होणार नाही. पारंपरिक वाद्यांचा वापर करा, अन्यथा विसर्जन मिरवणुकीत मिक्सर असलेल्यांवर कारवाई होणारच, असे पोलीस अधिक्षक संजय मोहिते यांनी स्पष्ट केले.

बैठक मंडळांच्या पदाधिकाऱयांसाठीच : पालकमंत्र्यांनी ठणकावले.

बैठक सुरू असताना डॉल्बीमालक तरूणाने पालकमंत्र्यांना आपली ओळख सांगितली. यावर ही बैठक मंडळांच्या पदाधिकाऱयांसाठी आहे. यात फक्त अध्यक्षांनीच बोलावे, असे पालकमंत्री पाटील यांनी सुनावले.

टाळय़ा ऐकायला आलेलो नाही : पालकमंत्री

बागल चौक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांच्या प्रश्नांवर काहींनी टाळय़ा वाजवल्या. यावर पालकमंत्र्यांनी आपण टाळय़ा ऐकायला आलो नाही. तसेच गुन्हे दाखल झाल्यानंतर न्यायालयात आपल्यासोबत टाळय़ा वाजवणारे येणार नाहीत, असा इशारा देताना नेहमी चांगल्याशी तुलना करा, असा सल्ला दिला.

मंडळांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

बैठकीत खंडोबा तालीम मंडळ, हिंदवी स्पोर्टस्, सुबराव गवळी तालीम मंडळ, उत्तरेश्वर वाघाची तालीम मंडळ, क्रांती बॉईज ग्रुप, नंगिवली तालीम मंडळ, बागल चौक, अवचितपीर तालीम मंडळ, रंकाळा टॉवर मित्र मंडळ, खरी कॉर्नर गणेश मंडळ, दयावान ग्रुप, जय भवानी स्पोर्टस, गणेश तरूण मंडळ राजारामपुरी 13 वी गल्ली, देशपांडे गल्ली मित्र मंडळ आदी 35 मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. यातील सुबराव गवळी तालीम, नंगिवली तालीम, हिंदवी स्पोर्टस, वाघाची तालीम, क्रांती बॉईज आदी मंडळांनी बैठकीतच डॉल्बी लावणार नसल्याचे सांगितले. खंडोबा तालीम, बालगोपाल तालीम मंडळाने सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

बैठकीला पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, संजय साळुंखे, निशिकांत भुजबळ, संजय मोरे, दिलीप जाधव, शशिराज पाटोळे, दिनकर मोहिते यांच्यासह खंडोबा तालीम मंडळाचे विक्रम जरग, हिंदवी स्पोर्टसचे सुदर्शन सावंत, अशोक माने, नामदेव लोहार, वसंत पोवार, सचिन पोवार, दत्तात्रय पाटील, रोहन मोहिते, प्रभाकर कदम, पवन माने, संतोष कालेकर, विशाल जाधव, सुरज कोळी, प्रीतम बांदिवडेकर, योगेश मोहिते, गौरव प्रभावळकर, दीपक माने, दीपक इंगवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: