|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जप्त केलेले साहित्य पालिका उद्यानात

जप्त केलेले साहित्य पालिका उद्यानात 

प्रतिनिधी/ मडगाव

मडगाव पालिकेच्या अतिक्रमण मोहिमेदरम्यान जप्त केल्या जाणाऱया वस्तू पालिका उद्यानात आणून टाकल्या जात असल्याने सदर उद्यानाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. पालिकेकडे असे साहित्य ठेवण्यास जागा नसल्याचे कारण पुढे करून ते या उद्यानात ठेवले जात आहे. पण त्यामुळे उद्यानाला ‘डंप यार्ड’चे स्वरूप प्राप्त झाले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.

जप्त केलेले साहित्य टाकले जात असल्याने उद्यानाची शोभा बिघडू लागली असून ते भंगारअड्डय़ावत वाटू लागले आहे, अशी प्रतिक्रिया आर्मस्ट्राँग वाझ यांनी व्यक्त केली आहे. यामुळे पालिका ‘फॉरवर्ड’ जात आहे की, मागे येत आहे असा प्रश्न उपस्थित होतो, असे वाझ यांनी म्हटले आहे. शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे निमंत्रक असलेले माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनीही या प्रकारावर टीका केली आहे. जागा नाही म्हणून जप्त केलेले साहित्य उद्यानात टाकणे अयोग्य असून पालिकेने त्यासाठी स्थायी जागा शोधणे गरजेचे आहे, असे मत कुतिन्हो यांनी व्यक्त केले आहे.

तसे पाहिल्यास मागील कित्येक वर्षांपासून पालिका अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान जप्त केलेले साहित्य ठेवण्यास जागा नसल्याची सबब पुढे करत आहे. मात्र जागा शोधण्याच्या बाबतीत पालिकेने गांभीर्य दाखविले नसल्याचे दिसून येते. याच सबबीखाली मार्केट निरीक्षक कारवाई करणे टाळत होते. पालिकेच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी साहित्य आणून टाकणे अजूनही बंद झालेले नाही. पालिकेने आता अशा साहित्यासाठी अनुरूप जागा शोधण्याच्या बाबतीत गंभीरपणे लक्ष द्यावे आणि जप्त केलेले साहित्य पालिका उद्यानात व प्रवेशद्वावर टाकणे बंद करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Related posts: